स्नेहालय ते राळेगण संवेदना यात्रा उद्यापासून

गांधी जयंतीचे औचित्य; पाच तालुक्‍यांत सायकल रॅली
नगर – महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने शनिवारी (दि. 29) स्नेहालय ते राळेगणसिद्धी अशी संवेदना जागृती सायकल यात्रा काढण्यात ेयेणार आहे. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाच तालुक्‍यांमधून जाणाऱ्या या सायकल यात्रेचा समारोप महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी राळेगणसिद्धी येथे होईल. समारोपप्रसंगी सर्व सायकलयात्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहात सहभागी होतील.
या सायकल यात्रेत पथनाट्य, समूहगीते यांच्या माध्यमातून समाजातील जाती, धर्म, लिंग, भाषा यांच्या आधारावरील वाढता भेदभाव, निरंकुश झालेला भ्रष्टाचार, असहिष्णुता, हिंसाचार, आर्थिक आणि सामाजिक विषमता याबद्दल लोकप्रबोधन केले जाणार आहे. स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाने या यात्रेचे आयोजन केले आहे. नगर जिल्ह्याच्या दुष्काळी दक्षिण भागातील शेतकरी, कष्टकरी, भटके विमुक्त आणि दलित समुदाय तसेच झोपडपट्ट्या, महिला आणि विविध सामाजिक गटांशी यात्रेकरू थेट संवाद करणार आहेत. विविध सामाजिक संस्थांमधून सायकल यात्री निवास करणार आहेत.
गेली 20 वर्ष सायकलवरून सर्व भारतात सामाजिक जागृतीसाठी भ्रमण करणारे हिरालाल यादव, भारतसेवक निक कॉक्‍स, श्रीमती जॉयस कनोली, क्रीडापटू वेदपाल तन्वर यांच्यासह अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. शनिवारी (दि. 29) सकाळी 9 ते 1 या वेळेत स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे सायकलयात्री आणि तरुणाईसोबत युवासंवाद हा कार्यक्रम होईल. दुपारी दोन वाजता सायकल यात्रेची स्नेहालयमधून सुरुवात होईल. रात्रीचा मुक्काम कोळगाव,(ता.श्रीगोंदे) येथे होईल. त्यानंतर 30 तारखेला घुगलवडगाव (ता.श्रीगोंदे) येथे बाबा आमटे संस्थेच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्रात यात्रेचा मुक्काम राहील. एक ऑक्‍टोबर रोजी श्रीगोंदे आणि पारनेर तालुक्‍यातील विविध गावांत यात्री जनसंवाद करतील. या वेळी फासेपारधी समूहाच्या वस्त्यांवर संवाद-भेटी होतील. एक ऑक्‍टोबर रोजी उक्कडगाव येथे यात्रेचा मुक्काम असेल. दोन ऑक्‍टोबरला बेलवंडीमार्गे सकाळी राळेगणसिद्धी येथे अण्णांसोबतच्या सत्याग्रहात यात्रेकरू सहभागी होतील. यात्रेत रोज रात्री महात्मा गांधी यांच्या जीवन-कार्य आणि विचारांवर संवाद होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये बाबा आमटे यांच्या “भारत जोडो अभियाना’च्या रौप्य महोत्सवानिमित्त नगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, पर्यावरणाची हानी आणि सामाजिक एकतेच्या संदर्भात लोकजागरणासाठी युवा निर्माणव्दारे सायकल यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.
या सायकलयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 9011114591, 9011026472 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन संयोजकांतर्फे महेश मरकड, श्‍याम आसावा, शबाना शेख, संगीता सानप, विशाल आहिरे, विकास सुतार, अमोल खरात, फारुक बेग, विकास पाटील, सुभाष शिंदे, मोनिका फिसके यांनी केले आहे. यात्रेत सर्व सामजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनाही सहभागी होता येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)