स्थायी समितीत आता कलाटे बंधुंची “पॉवर’

 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेची “तिजोरी’ असलेल्या स्थायी समितीमध्ये आता वाकडच्या कलाटे बंधुंची “पॉवर’ पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेवक मयूर कलाटे आणि शिवसेनेकडून गटनेता राहुल कलाटे यांची समितीवर निवड झाल्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधातील धार आणखी तीव्र होईल, असे चित्र आहे. कारण, राहुल कलाटे आणि मयूर कलाटे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही कलाटे हे वाकड परिसराचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे या प्रभागाची महापालिकेतील आणखी ताकद वाढली आहे.

महापालिका स्थायी समितीवर शुक्रवारी आठ सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली. राजकीय पक्षांच्या तौलानिक संख्याबळानुसार गटनेत्यांनी सूचविलेली नावे महापौर राहुल जाधव यांनी सभागृहात जाहीर केली. यामध्ये भाजपच्या चार, राष्ट्रवादीचे दोन तसेच शिवसेना व अपक्ष आघाडीचे प्रत्येकी एक अशा एकूण आठ सदस्यांची वर्णी लागली आहे.
नियुक्‍त सदस्यांमध्ये भाजपचे राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर आणि मयूर कलाटे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी स्वत:चे नाव स्थायी समितीसाठी सुचिविले. याशिवाय अपक्ष आघाडीकडून ज्येष्ठ नगरसेविका जामाबाई बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी(दि.22) पारत पडली. आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असून, राजकीय तौलानिक बळानुसार भाजपचे 10, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याला संधी मिळाली आहे. स्थायीमधील भाजप सदस्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, आणि विकास डोळस तर राष्ट्रवादीचे राजू मिसाळ आणि मोरेश्‍वर भोंडवे, अपक्ष साधना मळेकर तसेच शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर संबंधितांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्‍ती केल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले.

स्थायीच्या अध्यक्षपदाची उत्सुकता…
अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये मोठी चढाओढ आहे. गेली सलग दोन वर्षे स्थायीचे अध्यक्षपद चिंचवडकडे ठेवण्यात आमदार लक्षमण जगताप यांना यश आले आहे. तर दोन्ही वर्षे महापौरपद भोसरीच्या वाट्याला आली आहेत. तिसऱ्या वर्षीचे स्थायीचे अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाईल, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

आमदार जगताप यांना आव्हान…
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्याकडे पाहीले जाते. तसेच, राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, जगताप आणि कलाटे बंधुंमध्ये राजकीय हेवेदावे अनेकदा दिसून येतात. चिंचवड हा जगतापांचा बालेकिल्ला असला तरी, कलाटे बंधुंमध्ये “युती’ झाल्यास जगतापांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच, महापालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीमध्ये कलाटेंची वर्णी लागण्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही कलाटे बंधू सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.