स्थायीची चावी, कुणाच्या हाती?

पिंपरी– स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्‍ती झाली आहे. त्यामुळे आता स्थायीच्या अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भोसरीच्या नगरसेवकांच्या बैठकीत स्थायी सदस्य संतोष लोंढे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. लोंढे यांना पक्षश्रेष्ठींनी यंदा स्थायीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी मंगळवारी (दि.26) पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी माजी महापौर नितीन काळजे, ऍड. नितीन लांडगे, लक्षमण उंडे, विकास डोळस, सागर गवळी, भीमाताई फुगे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत केल्यानंतर, अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्वत:कडे ठेवण्यासाठी आमदार लक्षमण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. पहिल्यावेळी आमदार जगताप यांच्या समर्थक सीमा सावळे यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. त्याचवेळी लांडगे गटाचे नितीन काळजे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.

दरम्यान, दुसऱ्यावेळी स्थायीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आमदार लांडगे यांनी जातीने लक्ष घातले होते. मात्र त्यावेळी देखील आमदार जगताप यांनी राजकीय खेळी करत, सलग दुसऱ्यांदा स्थायीचे अध्यक्षपद आपल्या गटाकडे ठेवण्यात यश मिळविले. ममता गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळी संतापलेले विद्यमान महापौर नितीन काळजे आणि नगरसेवक राहुल जगताप यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे सोपविले होते. मात्र, हे राजीनामा नाट्य पेल्यातले वादळ ठरले.
आता तिसऱ्यांदा स्थायीच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा देखील धोबीपछाड होऊ नये, याकरिता लांडगे गटाच्या नगरसेवकांनी कमालीची खबरदारी घेतली आहे. आतापर्यंत दोन वेळा महापौरपद भोसरी विधानसभेतील ग्रामीण भागाच्या वाट्याला आले आहे. आता भोसरीकरांची स्थायी अध्यक्षपद मिळविण्याची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी महापौर जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संतोष लोंढे यांच्या स्थायी अध्यक्षपदाच्या दाव्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. शेवटी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याची माहिती देण्यात आली.

याबाबत नितीन काळजे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांची भेट घेत, स्थायी अध्यक्षपदाची मागणी केली आहे. याबाबत आमदार लक्षमण जगताप यांचीदेखील भेट घ्यायची होती. मात्र ते बाहेर असल्याने ही भेट होऊ शकली नाही. तर यंदा संतोष लोंढे हे स्थायी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्ष पातळीवर निर्णय होईल, तो होईल. मात्र, लोंढे यांच्या उमेदवारीबाबत आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. शेवटी एकत्र बसून निर्णय घेतला जाईल.

महापौर पद हुकले, स्थायी अध्यक्षपद मिळेल काय?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद इतर मागासवर्ग संवर्गासाठी राखीव आहे. गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेत, महापौर पदासाठी संधी देण्याची मागणी संतोष लोंढे यांनी केली होती. मात्र, त्यांच्याऐवजी राहुल जाधव यांना महापौर पदाची संधी मिळाली. त्यानंतर लोंढे यांची स्थायी समिती सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर आता राहुल जाधव यांना सोबत घेत, लोंढे यांनी स्थायी अध्यक्षपदावर दावा केला आहे.

महापौर राहुल जाधव यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने या विषयावर माझ्याशी चर्चा केली आहे. शेवटी प्रत्येक सदस्याला स्थायी अध्यक्षपदाची इच्छा आहे. याबाबत कोणताही निर्णय घेताना भाजपवर कोणाचाही दबाव नसतो. शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन स्थायी अध्यक्षपद निवडीचा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
एकनाथ पवार
सत्तारूढ पक्षनेते

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.