सोसायटीच्या चेअरमनकडून सदस्याला बेदम मारहाण

भारती विद्यापीठ पोलिसांकडून तब्बल आवड्यानंतर गुन्हा दाखल ; आरोपी फरार
पुणे,दि.8- पुण्यात एका सोसायटीच्या मिटींगमध्ये पाण्यावरून चर्चा सुरू असताना सोसायटीच्या चेअरमनने एका सदस्याला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल एक आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. यासाठी फिर्यादीला पोलीस आयुक्तांचे दार ठोठवावे लागले. यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांच्या कार्यपध्दतीवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कात्रज(भारती विद्यापीठ) येथील भारती विहार सोसायटीमध्ये 31 मार्चला ही घटना घडली. याप्रकरणी विश्वजीत किर्तीकर यांनी तक्रार दिली आहे. त्यांची तक्रार सहा एप्रिल रोजी भारती विद्यापीठ पोलीसांनी दाखल करुन घेतली. तक्रार दाखल करुन घेण्यासाठी फिर्यादीला पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्याकडे दाद मागावी लागली. पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी दखल घेत फिर्याद नोंदवून घेतली. फिर्यादी हे पुणे रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. तर आरोपी मिलींद नारायण पाटील हा प्रगतशील शेतकरी व व्यवसायीक असल्याचे सांगितले जाते.
यासंदर्भात दैनिक प्रभातशी बोलताना विश्‍वजीत किर्तीकर यांनी सांगितले, सोसायटीत पाण्याचं समान वाटप होत नव्हतं. यादंर्भात सेक्रेटरीने 31 मर्चाला बैठक बोलावली होती. या बैठकीत मुद्दा मांडताना मी सोसायटीचे चेअरमन मिलिंद नारायण पाटील आणि त्याचे मित्र सोसायटीच्या ए आणि बी विंगमध्ये राहतात. त्यांना 24 तास पाणी मिळत असल्याचा मुद्दा मांडला. याच वेळी पाटील तेथे दाखल झाले, त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. माझ्या कानशीलात लगावून मला लाथाबुक्‍क्‍यांनी मारले. यावेळी तेथे उपस्थित महिलामध्ये पडल्याने माझा जीव वाचला. मी तडक तसाच भारती विद्यापीठ पोलीस चौकीत तक्रार दाखल करायला गेलो. तेथेही पाटील याने मागोमाग येऊन मला मारहाण करण्याची धमकी दिली. मात्र तेथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी आणी भोसले यांनी त्याला थोपवले. मात्र माझी तक्रार पोलीस ठाण्यास देण्यास सांगून माला ससूनला पाठवले. ससूनमधील वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीस ठाण्यात दिले मात्र तक्रार दाखल करुन घेतली नाही. पोलिसांनी दोन एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.हा प्रकार मी सोसायटीतील लोकांना सांगितला असता त्यांनी मला पाठिंबा देत चेअरमनचा निषेध नोंदवणारी बॅनर्स सोसायटी बाहेर लावली. तसेच चेअरमनची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र हे बॅनरही पाटील याने फाडून टाकले. दखलपात्र व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी मला पोलीस आयुक्तांकडे दाद मागावी लागली. पोलिस आयुक्तांनी प्रकरणाची भांगीर्याने दखल घेतली तसेच पोलीस ठाण्याला फोन लावून तक्रार दाखल करण्यात लावले. सरतेशेवटी 6 एप्रिल रोजी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. इतकी गंभीर घटना असूनही भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याची लवकर दखल घेतली नाही. यामुळे आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला आहे.
भारती विद्यापीठ सोसायटीच्या बैठकीमध्ये पाणी प्रश्‍नासंदर्भात चर्चा सुरु होती. यावेळी किर्तीकर यांना सोसायटीच्या चेअरमनकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ऍट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.– विष्णू पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.