सोसायटीचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

24 तासांत तपासणी करणार : इमारतीला तडे गेल्याच्या तक्रारी

पुणे – सीमाभिंत कोसळलेल्या ऍल्कॉन स्टायलस सोसायटीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शेजारील नवीन बांधकामाच्या खोदाईसाठी मोठ्या प्रमाणात पोकलेन मशीन वापरण्यात येते होते. त्यामुळे इमारतीला गेल्या काही दिवसांपासून हादरे बसत होते. तसेच इमारतीला अनेक ठिकाणी चिराही गेल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून सीमाभिंत कोसळल्यानंतर या इमारतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत हे ऑडिट करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकेकडून तातडीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिट विभागाचे प्रमुख बी. जी. बिराजदार यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी या इमारतीची प्राथमिक पाहणी केली आहे. कोंढव्यातील सर्वे क्रमांक 18-पी आणि 19-पी येथील भूखंडावर कांचन डेव्हलपर्सची कंपनी एसव्हीजी बिल्डर्स एलएलपी या कंपनीकडून एसव्हीजी रॉयल एक्‍झोटिका फेज-1 व 2 अशा इमारती बांधण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंजुरी दिली होती.

जानेवारीपासून या ठिकाणी काम सुरू झाले होते. 2 फेजमध्ये 152 फ्लॅट बांधले जाणार होते. या इमारतीचा पाया घेण्यासाठी आणि पार्किंगसाठी खोदकाम करण्यात आले होते. त्याचा हादरा गेल्या काही दिवसांपासून बसत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांकडून यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, या ऑडिटचा अहवाल आल्यानंतर महापालिकेकडून इमारतीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोंढवा येथील दुर्घटनेची चौकशी करुन जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार आवश्‍यक ती मदत केली जाईल. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर भेट दिली असता, बांधकाम मजुरांसाठी केलेली व्यवस्था सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे बांधकामाविषयक सर्व माहिती उपलब्ध आहे.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे.

घटनेतील दोषी व्यक्‍तींवर तातडीने कठोर कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. यातील निरपराध माणसांचे मरण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाले आहे. अटींचे योग्य पालन न केल्यामुळे ही घटना घडली आहे.
– बाबा आढाव, कामगार नेते

या दुर्घटनेतील मृत व्यक्‍तींना श्रद्धांजली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून शासन मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना योग्य ते मदत निश्‍चित करेल. अतिरिक्‍त आयुक्त, अभियंता, पोलीस उपायुक्त यांची संयुक्त समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
– संजय भेगडे, राज्यमंत्री

कोंढवा येथील या दुर्घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तातडीने अहवाल देईल. त्यामुळे घटनेला नक्की कोण दोषी आहे, हे पुढे येईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– विजय शिवतरे, राज्यमंत्री. 

Leave A Reply

Your email address will not be published.