सोलापुरात प्रकाश आंबेडकरांविरोधात काम करणाऱ्यांची ‘एमआयएम’ हकालपट्टी करणार – इम्तियाज जलील

औरंगाबाबद – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या रूपामध्ये एक नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळाले होते. भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी एकत्र येत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने राज्यात दलित-मुस्लिम ऐक्याची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. राज्यभरातून प्रकाश आंबेकर यांच्या नेतृत्वाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात चांगल्याच जागा मिळतील असा विश्वास ‘वंचित’चे नेते बोलून दाखवत होते. मात्र निकालांनंतर राज्यातील ४८ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना देखील येथून पराभवाचा सामना करावा लागला होता. सोलापुरातून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या पराभवानंतर एमआयएमच्या काही स्थानिक नेत्यांद्वारे सुशीलकुमार शिंदे यांना मदत झाल्याचे बोलले जात होते. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज इम्तियाज जलील यांनी सोलापुरातून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदेंना मदत करणाऱ्या एमआयएम पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना इम्तियाझ जलील यांनी ही माहिती दिली असून ते म्हणतात, “सोलापुरातून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदेंना काही स्थानिक एमआयएम कार्यकर्त्यांनी तथा पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती आहे. जर ही माहिती खरी असेल तर अशा कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात येईल. याबाबतचे पुढील सर्व निर्णय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा झाल्यानंतरच घेण्यात येतील.”

Leave A Reply

Your email address will not be published.