सोमेश्‍वनगर परिसरात दोन दिवसांपासून कोसळधारा

जनजीवन विस्कळीत : वाकीतील तलाव आठ वर्षांनंतर भरण्याच्या मार्गावर

वाघळवाडी – बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरनगर परिसरात शुक्रवार (दि. 18) रात्री 11.30 वाजेपासून वरुणराजाने बरसायला सुरुवात केली, यात काहीवेळापूरती विश्रांती घेत तो तब्बल 40 तासांपासून बरसतच आहे. दरम्यान, रविवारी (दि. 20) दुपारनंतर त्याने थोडी विश्रांती घेतली असली, तरी पुढील 24 तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्याता आल्याने निवडणुकीचा टक्‍का घसणार असल्याचे बोलले जात आहे.

पाऊसपावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. तर तरकारी पिकाची तोडणी होत नसल्यामुळे नासाडी होत आहे. त्याचबरोबर दूभत्या जनावरांसाठी लागणारा हिरवा चाराही संततधार पावसामुळे कापणी करता येत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

पावसामुळे मोराळे (मुर्टी) तलाव पूर्णपणे भरला असून त्यातील पाणी मागील काही तासांपासून वाकी तलावात येत होते. रविवारी (दि. 20) दुपारी तीन वाजेपर्यंत तलाव 70 टक्‍के भरला होता. तर संततधार पाऊस काही तास असाच बरसत राहिला तर वाकीतील तलाव 8 वर्षांनंतर प्रथमच भरेल, अशी माहिती वाकी गावचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी दिली. मुरूम गावातील साळोबावस्ती येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असल्याने अनेक घरांमधील जीवनावश्‍यक वस्तू, धान्यांचे ऐन दिवाळीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असल्याने दिवाळी आधीच दिवाळे निघाल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी हताशपणे व्यक्‍त केली.

मुरूम मतदान केंद्रात बाहेर साचले तळे
मुरुम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदानकेंद्र बाहेर पावसाच्या पाणी साचून तळे निर्माण झाल्याने सोमवारी (दि. 21) या केंद्रावर मतदान कसे पार पडणार असा सवाला उपस्थित झाला आहे.

पावसामुळे खरेदीवर पाणी
दिवाळीसाठी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने व दिवाळी सणाच्या आधीचा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी खरेदीचे बेत आखले होते; परंतु पावसामुळे त्यांना बाहेरच पडता न आल्याने विशेषत: महिला वर्गाचा मोठा हिरमोड झाल्याने याचा मोठा परिणाम व्यवहारव झाल्याचा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. तीच अवस्था कापड व्यावसायिकांची सुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर दिवाळीत विक्रीसाठी माल भरला असून बक्षीस योजनाही लावलेले आहेत. पण ग्राहक होत असलेल्या संततधार पावसामुळे फिरकत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावरही धुमाकूळ –
जे म्हणतात ना, आमची फार वरपर्यंत ओळख आहे… त्यांना एक विनंती आहे.. जरा तो पाऊस तेवढा बंद करा राव, पुन्हा एकदा पावसाने निर्णय बदलला म्हणतो दिवाळीतील फराळ करूनच जाईन, अरे येऊन येऊन येणार कोण पावसाशिवाय हायच कोण.

Leave A Reply

Your email address will not be published.