सोनाराकडील लुटीचा तपास “जैसे थे’

संगमनेर – सोनाराकडील पंधरा लाख रुपये लुटण्याच्या घटनेला वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही शहर पोलिस ठाण्यात संबधित सराफाने कोणतीच तक्रार दाखल न केल्याने सराफ आणि पोलिस असे दोघेही संशयाच्या गर्तेत सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बसस्थानक चौकातून रोकड लंपास होऊन सुध्दा केवळ फिर्यादीअभावी तपास ठप्प आहे. त्यामुळे लुटीची खरेच घडली की हा बनाव होता याची चर्चा सुरु आहे.
संगमनेरमधील सोन्या चांदीचे व्यापारी शिवाजी मैड 10 मे रोजी संध्याकाळी दुकान बंद करुन आपल्या घरी जात असतांना बसस्थानक चौकात पल्सरवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडील पंधरा लाखाची रोकड लंपास केली. सराफाने चोरट्यांचा पाठलाग करत दोघांनाही समनापुर शिवारात पकडले होते. तेथून देखील मुख्य आरोपी पैशाची बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला तर पकडलेल्या दुसऱ्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला असला तरी लुटल्या गेलेल्या पैशासंदर्भात सोनाराने कोणतीच तक्रार पोलिस ठाण्यात दिली नसल्याने तसेच वारंवार यासंदर्भात फिर्याद देण्यास सांगुनसुध्दा सराफाने फिर्याद दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करत त्याला अटक केली. एकीकडे शहर पोलिसांचे गुन्हेगारीवरील नियंत्रण सैल झाले असतांनाच शहराच्या बसस्थानक चौकात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांवर टिकेची झोड उठली. मात्र आता यासंदर्भात संबधित सराफानेच फिर्याद देण्यास टाळाटाळ चालविली असल्याने संशय वाढला आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनीच आता या घटनेसंदर्भात पुढाकार घेऊन सखोल चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)