सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – बांधकाम व्यवसायात भागीदारी करण्याच्या अमिषाने एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 31 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी फेटाळला. संतोष पोपट चव्हाण (रा. मांजरी बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी 62 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

चव्हाण याच्या अटकपूर्व जामिन अर्जास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी विरोध केला. तर, फिर्यादीच्या वतीने ऍड. विक्रम भाटे, ऍड. राहुल फुलसुंदर, ऍड. अक्षय कदम यांनी काम पाहिले. चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. फिर्यादी यांना सदनिका घ्यायची होती. त्यानिमित्तने चव्हाण आणि फिर्यादींची ओळख झाली.

याच चर्चेतून माझा व्यवसाय नवा आहे. मला भागीदाराची गरज आहे. चालू असलेल्या साईटमध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर कोणताही करारनामा न करता फिर्यादींकडून रक्कम घेऊन भागीदारी देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चव्हाण याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.