मुलीसह जावयाविरोधात गुन्हा दाखल
पुणे – वयोवृध्द पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा मिळून 7 लाख 35 हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हा ऐवज त्यांची मुलगी आणि जावायाने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हांडेवाडी रोड परिसरात राहणाऱ्या 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह पुरूषाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह चिंतामणीनगर, हांडेवाडी रस्ता परिसरात राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. गतवर्षी मुलगी जावयासह फिर्यादींच्या घरात काही काळासाठी रहावयास आली होती.
दरम्यान, फिर्यादींची पत्नी आजारी पडल्यामुळे त्यांना 1 जून ते 3 जुलै 2017 या कालावधीमध्ये उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. फिर्यादी हे पत्नीची देखभाल करण्यासाठी दवाखान्यात जात होते. त्यांच्या अनुपस्थितीत घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्क आणि सोन्याचे दागिने असे एकूण 7 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला. काही महिन्यांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा ऐवज मुलगी आणि जावयाने चोरी केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले असून तेही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची विवाहित मुलगी त्यांच्या घरी पतीसह रहावयास आली होती. या काळातच कपाटातील रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाली. दरम्यान, आजारी असलेल्या आईला उपचारासाठी दागिने मोडून पैसे दिले, असे चौकशी दरम्यान मुलीने सांगितले आहे अशी माहिती तपासाधिकारी सहायक निरीक्षक एस.आर. शिंदे यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा