सुरेल जीवनासाठी कवितेची नितांत आवश्‍यकता

  • कवी हनुमंत चांदगुडे यांचे मत : सुबोध व्याख्यान माला

निगडी (वार्ताहर) – कविता भाकरी देत नाही, असा अनेकांचा आक्षेप असतो. पोटाची भूक भागवण्यासाठी कष्टाने भाकरी मिळवता येते; पण जगणे सुरेल होण्यासाठी जीवनात कवितेची नितांत आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कवी, गीतकार हनुमंत चांदगुडे यांनी केले.

आकुर्डी येथे खंडोबा देवस्थान ट्रस्ट, आकुर्डी ग्रामस्थ प्रणीत आणि पिंपरी-चिंचवड व्याख्यान माला समन्वय समिती आयोजित तीन दिवसीय सुबोध व्याख्यान मालेत “कविता तुमच्या-आमच्या जगण्याच्या’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना हनुमंत चांदगुडे यांनी विविध भावनांचा आविष्कार करणाऱ्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पांढारकर अध्यक्षस्थानी होते. दिलीप सुगवेकर, व्याख्यान माला समन्वयक राजेंद्र घावटे, कवी प्रदीप गांधलीकर, अप्पा गवारे, मुख्य संयोजक शंकर काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृत सुभाषितात सांगितल्याप्रमाणे काव्य, शास्त्र, विनोद जर मानवी जीवनात नसेल, तर जगणे निरस होते, असे विचार दिलीप सुगवेकर यांनी मनोगतातून मांडले.

कवी, गीतकार हनुमंत चांदगुडे म्हणाले, मूल जन्माला आल्यावर जेव्हा पहिल्यांदा “ट्यॅहा’ म्हणते, तीच एक सुंदर कविता असते आणि तेथूनच माणसाच्या जीवनात कवितेचा प्रवास सुरू होतो. खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनात कविता असते; पण हजारात एखादा ती शब्दबद्ध करतो, म्हणून समाज त्याला कवी म्हणून ओळखतो. कविता ही फक्‍त शहरी लोकांनी लिहिण्याची गोष्ट आहे किंवा त्यांचीच मक्‍तेदारी आहे, असाही समज आहे; परंतु कविता ही ग्रामीण जीवनात फुलते, ही वस्तुस्थिती आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता शेती-मातीतच फुलली होती. शेतात कष्ट करणारा शेतकरी जेव्हा घामाने डबडबतो आणि विसाव्यासाठी झाडाखाली कमरेवर हाथ ठेवून निवांत उभा राहतो, तेव्हा त्याच्या रूपात कवीला विठ्ठल दिसतो. कविता फक्‍त अक्षरांचा खेळ नसतो; तर कविता आत्म्यातून बाहेर आली पाहिजे. लहान बाळाशी एखादी आजी जेव्हा आपले वय विसरून बोबड्या बोलांनी त्याला खेळवते, तिथे कविता प्रकट होत असते.

सुभाष पागळे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)