पिंपरी – सुरक्षेचे कारण देत रोखला मोर्चा

तळेगाव दाभाडे – भारतीय मजदूर संघ संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी बुधवार (दि.20) पुणे येथून काढण्यात आलेला पायी मोर्चा मंत्रालयावर पोहचवण्यापूर्वीच तळेगाव दाभाडे येथे रोखण्यात आला. सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षेचे कारण पुढे करत पोलिसांनी हा मोर्चा रोखला असून सायंकाळी आंदोलकांना सरकारी गाड्यांमध्ये घालून ग्रामीण पोलीस मुख्यालयावर नेण्यात आले.

विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथून बुधवार (दि.20)रोजी मंत्रालय मुंबई येथे निघालेल्या  मोर्चात 1400 वीज कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. आकुर्डी (पुणे) येथे मुक्काम करून गुरुवारी मोर्चा तळेगाव दाभाडे (ता.मावळ) हद्दीतील सुशिला मंगल कार्यालयात विश्रांतीसाठी थांबला होता. मोर्चाला तळेगाव दाभाडे येथेच थांबवण्याची पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तळेगाव दाभाडे येथे मोठा पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला होता. सशस्त्र पोलीस बंदोबस्तात कामगार नेत्यांशी चर्चा करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलकांनी तळेगाव दाभाडे येथून परतावे यासाठी कामगार नेते अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार आदींशी वारंवार चर्चा सुरू होती. अखेर सायंकाळी आंदोलकांना सरकारी गाडीत घालून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय नेण्यात आले.

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वीज उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे रिक्‍त पदांवर कामाच्या गरजेप्रमाणे सुमारे 25 हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या कामगारांना कंत्राटदारांमार्फत कागदोपत्री किमान वेतन दिले जाते. परंतु, प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतनही हातात मिळत नाही. कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेल्या भविष्य निर्वाह निधी, इ.एस.आय., वेतन चिठ्ठी, अपघात नुकसान भरपाई, ग्रॅच्युईटी रक्‍कम, बोनस आदी बाबतीत कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे केलेले आहेत. याबाबतीत दाद मागणाऱ्या कामगारांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे. अशा ठेकेदारांवर कारवाई करावी, वीज उद्योगातील पूर्वाश्रमीची रोजंदारी कामगार पद्धत (एन. एम.आर.) राबवून कामगारांना न्याय द्यावा. या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी दाद मागण्यासाठी भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून पायी मोर्चा काढण्यात आला होता.

काय आहेत मागण्या?
वीज उद्योगात तात्पुरत्या कामगारांना न्याय देणारी पुर्वाश्रमीची रोजंदारी कामगार पद्धत (एन.एम.आर.) वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना लागू करावी. वीज उद्योगात अनेक वर्षे काम केलेल्या परंतु, सध्या नोकरीपासून वंचित असलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे. कामगारांकरीता बंधनकारक असलेले किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना या मध्ये आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केल्या आहेत.

 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्‌याच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात हाय अलर्ट असल्याने मोर्चाला मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यात आले. मोर्चात हजारो वीज कंत्राटी कामगार असल्याने त्यांची सुरक्षा महत्वाची आहे.
– संदीप जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.