सुधा सिंग व अय्यासामी यांना रुपेरी यश 

जकार्ता: सुधा सिंग आणि धरुन अय्यासामी या धावपटूंनी अनुक्रमे 3000 मीटर स्टीपलचेज आणि पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई करताना आशियाई क्रीडास्पर्धेतील नवव्या दिवशी भारताला रुपेरी यश मिळवून दिले.
भारताची युवा धावपटू सुधा सिंगने स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावत रौप्यपदकाची कमाई केली. सुधाने 3000 मीटरचे अंतर 9 मिनिटे 40.03 सेकंद वेळेत पार केले. सुवर्णपदक पटकावणाऱ्या बेहरिनच्या यावी विनफ्रेडने हे अंतर 9 मिनिटे 36.52 सेकंदांमध्ये पूर्ण केले. सुधाने यापूर्वी 2010 साली झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर थेट 2018 साली सुधाला आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक पटकावता आले आहे. सुधाने यापूर्वी आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत 2017 साली रौप्यपदक पटकावले होते.
पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अय्यासामीने 48.96 सेकंदात स्पर्धा पूर्ण करुन आपला राष्ट्रीय विक्रम मोडत रौप्यपदकाची कमाई केली. मात्र, त्याला कतारच्या अब्देररेहमान सांबाला हरवता आले नाही. सांबाने ही शर्यत 47.66 सेकंदात पूर्ण केल्याने त्याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. अय्यसामीचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 49.45 सेकंदांचा होता. स्पर्धेच्या 300 मीटर अंतरापर्यंत अय्यासामी चौथ्या स्थानावर होता. त्यानंतर त्याने वेग वाढवताना शेवटच्या 100 मीटरमध्ये दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. मात्र त्याला सांबाला मागे टाकणे जमले नाही. याच स्पर्धेत भारताचा संतोष कुमारही अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र त्याला पदक मिळवण्यात अपयश आले. 2010 नंतर या प्रकारात हे भारताचे पहिलेच पदक ठरले आहे. यापूर्वी या प्रकारात 2010 साली जोसेफ अब्राहमने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
महिलांच्या लांब उडीत भारताच्या नीना वाराकिलला रौप्यपदक 
भारताच्या नीना वाराकिलने महिलांच्या लांब उडी प्रकारात 6.51 मीटर उडी मारताना रौप्यपदकाची कमाई केली. व्हिएअतनामच्या थि थु थाओने 6.55 मीटर लांब उडी घेताना सुवर्णपदकाची कमाई केली. चीनच्या झियाओलिंग झु हिने 6.50 मीटर उडी घेत कांस्यपदकाची निश्‍चिती केली. वाराकिलने आपल्या चौथ्या प्रयत्नात 6.51 मीटर उडी मारली. ही तिचा सर्वोत्तम प्रयत्न होता. तसेच थाओने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 6.55 मीटर पर्यंत लांब उडी घेत मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. या प्रकारात दुसरी भारतीय खेळाडू जेम्स नयना हिला केवळ 6.14 मीटर पर्यंत उडी घेता आल्यामुळे ती पदकाच्या आसपासही पोहोचली नाही. नीनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वी नीनाने 2017 साली भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर नीनाचे हे दुसरेच पदक आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)