सुधारणांसाठीच्या ठोस उपाययोजनांबाबत “जी-20′ देशांवर जबाबदारी

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आवाहन

वॉशिंग्टन :  “जी-20′ देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बॅंकांच्या गव्हर्नरांनी बैठकीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने आणि ती रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर प्रामुख्याने भर दिला. दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याबाबत जी-20 देशांवर जागतिक धोरणाचा समन्वय साधण्याची जबाबदारी आहे, असे केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

निर्मला सितारामन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळ, जी-20 देशांचे अर्थमंत्री, केंद्रीय बॅंकांचे गव्हर्नर आणि ब्रिक्‍स देशांचे अर्थमंत्री काल वॉशिंग्टन इथल्या बैठकीत सहभागी झाले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

जागतिक मंदीला सामोरे जातांना सामुहिक कृतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उदयन्मुख अर्थव्यवस्थांसमोर आर्थिक विकास साध्य करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे आव्हान आहे असे सांगून त्यांनी जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी रचनात्मक सुधारणांच्या महत्वावर भर दिला.

यावेळी त्यांनी अलिकडेच कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीचे उदाहरण दिले. भारताने कॉर्पोरेट कर 30 टक्क्‌यांवरुन 22 टक्क्‌यांपर्यंत कमी केला. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या. जी-20 देशांनी एकत्रित कृती करुन आव्हानांना सामोरे जाणे सहज शक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिक्‍स देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत नवीन विकास बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच अधिकृत आर्थिक संचालक कार्यक्रमाबाबत सर्व सहमती निर्माण करण्याबाबत चर्चा झाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.