सुटीच्या काळात जास्तीत जास्त दीडपट भाडे आकार

खासगी वाहनांचे भाडेदर निश्‍चित : प्रवाशांच्या लुबाडणूकीला बसणार चाप


अधिक भाडे आकारल्यास वाहनांचा परवाना रद्द

मुंबई – गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात अवाजवी वाढ करतात. जास्त गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्‍चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यानुसार खासगी कंत्राटी वाहनांना आता गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. किंबहुना या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा/ नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

रावते म्हणाले, राज्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इत्यादी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीच्या हंगामामध्ये (उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, गणेशोत्सव, होळी, नाताळ सुट्टी इत्यादी काळामध्ये) या वाहतूकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे या वाहनांचे भाडेदर निश्‍चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले होते. त्यानुसार हे भाडेदर निश्‍चित करण्यासाठी पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.

या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी सुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. या वाहनांची वर्गवारी प्रामुख्याने वातानुकुलित (एसी), अवातानुकुलित (नॉन एसी), शयनशान (स्लीपर), आसन व्यवस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लीपर) इत्यादी प्रकारात करण्यात आली आहे.

या खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्‍चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीटदर आकारणे बंधनकारक राहील. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)