सुजीत झावरे यांच्याविरोधात आर्थिक आरोप

अजित पवार यांनी घेतली गंभीर दखल; नोटिशीला अद्याप उत्तर नाही

प्रभात वृत्तसेवा
नगर –जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्यांशी हातमिळवणी करून आणलेल्या अविश्‍वास ठरावाची माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. नगरच्या आजच्या भेटीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झावरे यांच्याविरोधात आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप केले. त्यामुळे पवार संतप्त झाले. पक्ष त्याची गंभीर दखल घेईल, असे त्यांनी सांगितले.
औरंगाबादहून बारामतीला जाताना पवार काही काळ नगर येथे थांबले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांची पारनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी भेट घेतली. माजी आमदार दादा कळमकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्रशांत गायकवाड, दीपक पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकरराव उचाळे, विक्रम कळमकर, अशोक सावंत आदी या वेळी उपस्थित होते. एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने तर आपला पक्षच शरद पवार असून पारनेरची जनता पवार यांना मानणारी असल्याचे सांगताना पारनेरमध्ये पक्षातील काही ठराविक मंडळी कशी पदांचा बाजार मांडतात, याची काही उदाहरणे दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारनेर तालुकाध्यक्षपद काही लाखांना कसे विकले, याचा पाढा काही कार्यकर्त्यांनी वाचला. झावरे यांच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या काळात कसे गैरव्यवहार केले जात होते, याचे किस्से पारनेर तालुक्‍यातील नेत्यांनी सांगितले. झावरे सोईचे राजकारण करतात, त्यासाठी मोठ्या आर्थिक तडजोडी करतात, असे आरोपही या नेत्यांनी केले.
तालुक्‍यात पदे वाटण्यावरून सामान्यांची गळचेपी केली जाते. झावरे यांना कंटाळूनच काशिनाथ दाते, वसंतराव चेडे आदी मंडळी पक्ष सोडून गेली, असे पारनेरकर मंडळींनी पवार यांच्या कानावर घातले. जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला उत्तर देण्याचे सौजन्य झावरे यांनी दाखविले नाही, असे काहींनी पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे पवार चांगलेच संतापले. पक्ष त्याची राज्यपातळीवर गंभीर दखल घेईल. पारनेरच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने राहावे. पक्ष त्यांच्यामागे ताकद उभी करील, अशी ग्वाही देताना पवार यांनी पक्षाचे जिल्हा प्रभारी, आमदार दिलीप वळसे पाटील व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. झावरे यांच्यासारखा कारभार राष्ट्रवादीला अपेक्षित नाही, असे त्यांनी ठणकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)