“सिलिंडर’मुळे उडतोय “भडका’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या घटनांमध्ये दिवसें-दिवस वाढ होत आहे. त्यामध्ये घरगुती सिलिंडर स्फोटाच्या घटनांचीही भर पडत आहे. अग्निशमन दलाकडील मागील पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली असता महिन्याकाठी सरासरी चार ते पाच घटना घडत आहेत.

एरव्ही उन्हाळा लागला की आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आगीच्या घटना केव्हाही होत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी चिंचवडेनगर येथे एका दुकानातील सिलेंडरला अचानक आग लागल्याने त्या दुकानदाराने सिलेंडर रस्त्यात टाकला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच कारवाई करुन आग विझवली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. आग लागण्याची कारणे पाहता गेल्या काही वर्षांपासून सिलेंडर हे आग लागण्याचे मुख्य कारण बनताना दिसत आहे. गॅस गळतीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर त्याची नोंद होते. त्यामुळे गॅस गळती, सिलिंडरला आग लागण्याच्या किरकोळ घटनांची बऱ्याचदा नोंद होत नाही. मात्र, या घटना सिलेंडर वापराबाबत जागृतीचा अभाव असल्याने होत असल्याचे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिलिंडर आधार कार्डशी लिंक केले असले तरी सिलिंडरचा काळाबाजार आजही कायम आहे. पुरवठा विभागाची पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आठ कार्यालये आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे साडेतीन लाख गॅस ग्राहक आहेत. त्यांना दररोज सरासरी आठ ते नऊ हजार गॅस सिलिंडर लागतात. त्यासाठी शहरात 14 गॅस एजन्सी आहेत. छोटे उद्योग, हॉटेल्स, धाबे, वडापाव व चायनीजच्या गाड्या आदी ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरच राजरोसपणे बेकायदा वापरले जात आहे. अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडर पहायला मिळतात. घरगुती सिलिंडर केंद्र सरकारच्या सवलतीमुळे कमी दरात मिळतो, मात्र त्या तुलनेत व्यापारी सिलिंडरची किंमत चौपट आहे. त्यामुळे व्यापारी वापरासाठीही घरगुती सिलिंडर काळाबाजार त्याच्या दुप्पट दाम मोजून घेतले जात आहेत. अशा पध्दतीने केला जाणारा बेकायदा सिलिंडरचा साठा आगीच्या घटनांना हात भार लावत असल्याचे मागील अनेक घटनांवरुन समोर आले आहे.

एकीकडे सिलिंडरचा बेकायदा साठा तर दुसरीकडे सिलिंडर हाताळण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे आगीच्या घटना घडत आहेत. घरातून बाहेर पडताना सिलिंडरचा कॉक बंद न करणे, गॅस गळती सुरु होताच सिलिंडर बाहेर न हलवणे, थोडी-थोडी गॅस गळती होत असतानाच त्याकडे दुर्लक्ष करणे, जुनाट झालेल्या सिलिंडरच्या पाईपकडे कानाडोळा अशा अनेक बाबी सिलिंडर स्फोटाच्या घटनांसाठी कारणीभूत ठरत आहेत.

सिलिंडरमुळे झालेल्या आगीच्या घटना
वर्ष-घटना
2015- 54
2016-59
2017 -42
2018 (जुलैपर्यंत) – 28

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)