सिमेंटच्या जंगलात ज्वारीचे पीक जोमात

वाकड – पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत सर्वच बाजूने सिमेंटची जंगले वाढलेली आहेत. चकचकीत शॉपिंग मॉल, गगनचुंबी इमारतींनी शहर व्यापून गेले आहे. शहर आणि उपनगरातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत.असे असतानाही शहराच्या काही भागात स्थानिकांनी आपली शेती जपून ठेवली असून परंपरागत शेती व्यवसाय करत आहे. थेरगाव येथे असेच सुःखद चित्र पहायला मिळत आहे.

पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, थेरगाव या भागातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, टोलेजंग इमारतींनी येथील पारंपरिक शेती व्यवसाय संपुष्टात आणला आहे. येथील वातानुकूलित व्यापारी संकुल पाहून पूर्वी या भागात शेती केली जायची यावर शहरात नव्याने येणाऱ्यांचा विश्‍वास बसत नाही. शेतजमिनी विकून गुंठामंत्री झालेल्यांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत थेरगाव काही ठिकाणी दिलासादायक परिस्थिती पहायला मिळत आहे.

थेरगाव बोटक्‍लब याठिकाणी शेतकरी सुरेश बारणे यांची शेती सध्या ज्वारीच्या पिकाने बहरलेली असून पक्षांपासून ज्वारीची राखण करता यावी म्हणून शेतामध्ये मधोमध लाकडी मांडव उभा केला आहे. त्याच्यावर उभे राहून हातात गोफण फिरवत पारंपरिक पद्धतीने पीकांची राखण केली जात आहे. हे दृश्‍य शहरवासीयांसाठी जणू दुर्मिळ झाल्याने हे शेती याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवसभर कडाक्‍याचे ऊन आणि रात्री हवेत पडणारा गारवा ज्वारीसाठी फायदेशीर ठरत असून ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. प्राणी आणि पक्षांपासून ज्वारीची राखण करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने गोफणीचा वापर केला जात आहे. परिसरातील शाळांमधील मुलांना आवर्जून ज्वारीची शेती दाखविण्यासाठी आणले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.