सिएट वार्षिक क्रिकेट पुरस्कार : विराट, रशीद, हरमनप्रीत यांना सर्वोच्च पुरस्कार 

फारोख इंजिनियर यांना जीवन गौरव, तर ख्रिस गेल “सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू’ 
सिएट वार्षिक क्रिकेट पुरस्कार शानदार समारंभात प्रदान 
मुंबई – क्रिकेटपटूंसाठी, तसेच क्रिकेटशौकिनांसाठीही महत्त्वाचे आणि अत्यंत प्रतिष्ठेचे सिएट वार्षिक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सिएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा प्रमुख पुरस्कार पटकावला. सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकन समितीने जाहीर केलेल्या या पुरस्कारांचे वितरण मुंबईत काल रात्री पार पडलेल्या एका शानदार समारंभात करण्यात आले.

गेल्या संपूर्ण मोसमात विराट कोहलीने फलंदाजीत अप्रतिम किामगिरी बजावताना भारतीय संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीने गेल्या वर्षभरात कसोटी, एकदिवसीय व टी-20 क्रिकेट अशा सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून 68.83 सरासरीने 2818 धावा फटकावल्या. त्यात 11 शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माने हा पुरस्कार स्वीकारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्य प्रमुख पुरस्कारांमध्ये भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारोख इंजिनियर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1971 मध्ये वेस्ट इंडीज व इंग्लंड या बलाढ्य संघांना त्यांच्याच भूमीवर पराभूत करताना परदेशात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली होती. फारोख इंजिनियर हे त्या संघाचे यष्टीरक्षक होते. तसेच त्यांनी अनेकदा भारतीय संघाचे सलामीवीर म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.

गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिखर धवनने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज हा पुरस्कार पटकावला. धवनने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने केले. तसेच त्यानंतर सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावताना भारतीय संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज हा पुरस्कार देण्यात आला.

टी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहून झटपट क्रिकेटमधील कामगिरीसाठीही वेगळे पुरस्कार देण्याची परंपरा या वर्षी कायम राहिली. न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज कॉलिन मन्‍रो याला वर्षातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज हा पुरस्कार देण्यात आला. तर आयपीएलमधील नेत्रदीपक कामगिरीमुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानने वर्षातील सर्वोत्तम टी-20 गोलंदाज हा पुरस्कार पटकावला.

गुणवान युवा खेळाडूंना पुरस्कार देण्याची परंपराही कायम राहिली. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कर्नाटकचा प्रतिभाशाली फलंदाज मयंक आगरवालने पटकावला, तसेच ऑस्ट्रेलियात झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या केवळ 18 वर्षीय शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला. मयंक आगरवालला हा पुरस्कार भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते देण्यात आला. तर शुभमनला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारताच्या एकदिवसीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने “वर्षातील सर्वोत्तम खेळी’ हा वेगळा पुरस्कार पटकावला. हरमनप्रीतने महिलांच्या विश्‍वचषक स्पर्धेतील उपान्त्य फेरीच्या लढतीत गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध 171 धावांची सनसनाटी खेळी केली होती. तिच्या या खेळीमुळेच भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी फारोख इंजिनियर यांच्या कामगिरीच्या आठवणी सांगतानाच इंजिनियर हे एक असामान्य यष्टीरक्षक आणि प्रेरणादायक आक्रमक सलामीवीर होते, असे नमूद केले. इंजिनियर यांच्या परदेशातील अनुभवाचा भारतीय संघाला नेहमीच मोठा फायदा झाल्याचे गावसकर यांनी नमूद केले.

इंजिनियर यांनी अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज रशीद खानचे कौतुक केले. अफगाणिस्तानसारख्या युद्धग्रस्त देशातून आलेला रशीद हा नेहमीच हसतमुख असतो. तसेच तो कायम खेळाचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे दिसून येते, असे सांगून इंजिनियर म्हणाले की, आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याला विजयाचा आनंद लुटता आला नाही. परंतु रशीदने त्यामुळे नाउमेद होऊ नये. रशीद खान हा खऱ्या अर्थाने क्रीडाक्षेत्रातील अफगाणिस्तानचा राजदूत असल्याचे सांगून इंजिनियर म्हणाले की, माझ्या मते रशीदने अफगाणिस्तानचा पंतप्रधान व्हावे. त्यामुळे त्याला देशाची आणि क्रिकेटची चांगल्या प्रकारे सेवा करता येईल.

सिएट पुरस्कार विजेत्यांची यादी- 
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू- विराट कोहली,
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज- शिखर धवन,
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज- ट्रेन्ट बोल्ट,
सर्वोत्तम टी-20 फलंदाज- कॉलिन मन्‍रो,
सर्वोत्तम टी-20 गोलंदाज- रशीद खान,
वर्षातील सर्वोत्तम खेळी- हरमनप्रीत कौर,
सर्वोत्तम देशांतर्गत क्रिकेटपटू- मयंक आगरवाल,
सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू- ख्रिस गेल,
सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू- शुभमन गिल,
जीवन गौरव पुरस्कार- फारोख इंजिनियर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)