महापालिका आयुक्तांकडे नगरसेवकांची मागणी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरत आली आहेत. त्यामुळे वड्गाव जलकेंद्रा अंतर्गत महापालिकेकडून सिंहगड रस्ता परिसरातील करण्यात येणारी आठवडयातील एका दिवसाची पाणी कपात तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी सिंहगड रस्ता परिसरातील नगरसेवकांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. नगरसेविका मंजूषा नागपूरे, अश्विनी पोकळे, किशोर पोकळे, मंगेश बुजवे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, ही पाणी कपात पुढील तीन दिवसात मागे घेण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असल्याचे नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उन्हाळयात शहरातील इतर भागातील वाढीव पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी महापालिकेकडून वडगाव जलशुध्दीकरण केंद्राअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयात कपात करण्यात आली होती. त्या पुरवठयाचे सात झोन करून आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येत आहे. त्यातच प्रत्येक गुरूवारीही पाणी बंद ठेवले जात आहे. परिणामी या एका बाजूल या भागातून जाणारा मुठा उजवा कालवा पाण्याने भरून वाहत असतानाही या भागातील नागरिकांना मात्र, आठवडयात दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागत आहे. तर उरलेल्या दिवसातही कमी दाबाने पाणी येत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाची तातडीनं बैठक घेऊन या भागातील पाणीकपात रद्द करावी अशी मागणी करण्यात आल्याचे नागपुरे यांनी स्पष्ट केले.