सिंधू, सायना, श्रीकांत यांची विजयी सलामी

  आशियाई बॅडमिंटन स्पर्धा; समीर वर्माचे आव्हान संपुष्टात

वुहान – अग्रमानांकित किदंबी श्रीकांत, राष्ट्रकुल सुवर्णविजेती सायना नेहवाल आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या अव्वल भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष व महिला एकेरीत विजयी सलामी दिली.

त्याचप्रमाणे बी. साई प्रणीथ आणि एच. एस. प्रणय यांनीही चमकदार विजयासह दुसरी फेरी गाठली. मात्र समीर वर्माचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच दुहेरीत भारतीय जोड्यांना संमिश्र यश मिळाले.पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदंबी श्रीकांतला जपानच्या बिगरमानांकित केन्टा निशिमोटोची कडवी झुंज मोडून काढण्यासाठी 13-21, 21-16, 21-16 अशी एका तासाहून अधिक काळ लढत द्यावी लागली.

पहिली गेम गमावल्यानंतर श्रीकांतने झुंजार पुनरागमन करताना अनुभवाच्या जोरावर पुढच्या दोन्ही गेम जिंकत बाजी मारली. दुसऱ्या फेरीत श्रीकांतसमोर चीनच्या वोंग विंग की व्हिन्सेंटचे आव्हान आहे. व्हिन्सेंटने पहिल्या फेरीत नेपाळच्या रत्नजित तमंगवर 21-16, 17-21, 21-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालने राष्ट्रकुल स्पर्धेतील फॉर्म कायम राखताना सिंगूपारच्या येओ जा मिनचा 21-12, 21-9 असा 33 मिनिटांत धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत सायनाची गाठ चीनच्या गाओ फॅंगजी हिच्याशी पडणार आहे. गाओने पहिल्या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-15, 23-21 असे चकित करीत सनसनाटी निकालाची नोंद केली. सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले होते.

सिंधूनेही चायनीज तैपेईच्या पेई यु पो हिची झुंज 21-14, 21-19 असी 44 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणली. दुसऱ्या फेरीत सिंधूला चीनच्या चेन शियाओजिन हिच्याशी लढत द्यावी लागेल.चेनने पहिल्या फेरीत व्हिएतनामच्या थय मिन्ह एनग्युएनचा 21-13, 21-9 असा फडशा पाडला. दरम्यान पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माला तैपेई चीनच्या चोऊ तिएन चेन याच्याविरुद्ध 21-23, 17-21 असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीतील आणखी एका लढतीत साई प्रणीथला थायलंडच्या सुप्पान्यू अविहिंगसेनॉनचा कडवा प्रतिकार मोडून काढण्यासाठी 21-13, 11-21, 21-19 अशी झुंज द्यावी लागली. ही लढत 62 मिनिटे रंगली. तसेच प्रणयने थायलंडच्याच वांगचेरॉन कान्टाफोनवर 21-15, 19-21, 21-19 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. हा सामनाही 67 मिनिटे रंगला.

   दुहेरीत संमिश्र कामगिरी

महिला व पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी विजयी सलामी दिली. महिला दुहेरीत मेघना जक्‍कमपुडी व पूर्विशा राम या भारतीय जोडीने ओंग रेन ने आणि वोंग जिया यिंग या सिंगापूरच्या जोडीचा 21-14, 20-22, 21-17 असा एका तासाहून अधिक काल रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसरी फेरी गाठली. तसेच पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्‍लोक या भारतीय जोडीने चुंग युई सेओक व किम डुकियोंग या कोरियन जोडीचा कडवा प्रतिकार 25-23, 23-21 असा 45 मिनिटांत संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली.

परंतु मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. किम वोन हो आणि शिन सेयुंग चॅन या मलेशियन जोडीने सौरभ-अनुष्का जोडीचे आव्हान 21-17, 21-14 असे 36 मिनिटांत संपुष्टात आणले. तसेच मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीच्या आणखी एका लढतीत वेंकट गौरव व जुही देवगण या भारतीय जोडीला ली चुन हेई आणि चोऊ होई वाह या चीनच्या जोडीविरुद्ध 11-21, 13-21 असा जेमतेम 19 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर व कुहू गर्ग या जोडीलाही झांग नान आणि लि यिनहुई या चिनी जोडीविरुद्ध 10-21, 17-21 असा केवळ 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)