सिंधू अंतिम फेरीत, सायनाचे कांस्यवर समाधान

संग्रहित छायाचित्र.....
सिंधू, सायना यांची ऐतिहासिक कामगिरी 
जकार्ता: रिओ ऑलिम्पिक तसेच जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती अनुभवी सायना नेहवाल यांनी आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सिंधूने पहिल्या उपान्त्य सामन्यात जपानच्या आकाने यामागुचीवर मात करीत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तर उपान्त्य सामन्यात तेई त्झु यिंगविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने सायना नेहवालने कांस्यपदकाची निश्‍चिती केली.
त्याआधी सिंधूने उपान्त्य फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आकाने यामागुचीचा 21-17, 15-21, 21-10 अशा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. या विजयामुळे महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तेई त्झु यिंगने दुसऱ्या उपान्त्य सामन्यात सायना नेहवालचा 21-17, 21-14 असा सहज पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. उपान्त्य फेरीत सायना नेहवालला पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे.
सिंधूसाठी सोनेरी इतिहास आता एका विजयाच्या अंतरावर आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. भारताने बॅडमिंटनमध्ये 2014 पर्यंत 8 कांस्यपदके जिंकली आहेत आणि त्यात 1982 साली सय्यद मोदी यांनी पटकावलेले एकेरीतील एकमेव पदक आहे. उर्वरित 7 पदके दुहेरी प्रकारातील आहेत.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूसमोर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आकाने यामागुचीचे आव्हान होते. या सामन्यात सिंधूला तगडे आव्हान मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात सिंधूने यामागुचीला चांगलेच झुंजवले. सिंधूने काही सुरेख फटक्‍यांनी गुण कमावले. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर गेल्याने यामागुची खचलेली दिसली. मात्र मध्यंतरानंतर यामागुचीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत काही चांगले गुण मिळवले. यावेळी यामागुचीने केलेला स्मॅश फटक्‍यांचा वापर पाहण्याजोगा होता. पहिला सेट जिंकण्यासाठी सिंधूला अवघा 1 गुण हवा असतानाही यामागुची सहज हार मानायला तयार नव्हती. अखेर सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत 21-17 च्या फरकाने पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडलेल्या यामागुचीने आक्रमक खेळ करत सिंधूला पिछाडीवर टाकले. मध्यंतरापर्यंत एका गुणाने आघाडीवर असणारी सिंधू उत्तरार्धात मागे पडली. यामागुचीने नेटजवळ खेळलेल्या फटक्‍यांमुळे सिंधू गोंधळली. याचा फायदा घेत यामागुचीने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी 5 गुणांवर गेल्यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागुचीने तोपर्यंत सेटवर आपली पकड मजबूत बसवली होती. अखेर 21-15 च्या फरकाने दुसरा सेट जिंकत यामागुचीने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.
तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घ्यायला सुरुवात केली. या वेळी सिंधूने यामागुचीवर वर्चस्व गाजवताना अनेक कल्पक फटक्‍यांचा वापर करत गुण कमावले. तिसऱ्या सेटच्या मध्यंतरापर्यंत सिंधूने आपल्याकडे 11-7 अशी आघाडी कायम ठेवली होती. अखेर 21-10 च्या फरकाने तिसरा सेट जिंकत सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
त्झु यिंगविरुद्ध सायना पुन्हा निष्प्र
दुसऱ्या उपान्त्य सामन्यात तेई त्झु यिंगविरुद्ध सलग दहाव्यांदा पराभूत झाल्याने सायनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. सामन्यात सायनाच्या चेहऱ्यावरील दबाव स्पष्ट जाणवत होता. यावेळी तिने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले, मात्र त्झु यिंगही तिच्या प्रत्येक फटक्‍याचे तितक्‍याचे त्वेषाने आणि आक्रमक प्रत्युत्तर देत होती त्यामुळे सायनावरील दबाव आणखीनच वाढलेला दिसला. त्झु यिंगने पहिल्याच सेटच्या सुरुवातीला 4-1 अशी आघाडी घेत सायनावरील दडपण वाढवले. मात्र त्यानंतर सायनाने आपल्या डावपेचांमध्ये बदल करताना ड्रॉप शॉट्‌सचा चांगल्याप्रकारे वापर करून लवकरच ही पिछाडी भरून काढत 8-8 अशी बरोबरी साधी. त्यानंतर यिंगने बॅकहॅंडच्या फटक्‍यांचा वापर करत पुन्हा आघाडी मिळवताना पहिला सेट 21-17 असा आपल्या नावे केला.
दुसऱ्या सेटमध्येही त्झु यिंगने सायनावर वर्चस्व गाजवताना आपला आक्रमक खेळ चालूच ठेवला. पहिल्यापासून आघाडी कायम राखताना त्झु यिंगने दुसरा सेट 21-14 असा जिंकत अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)