साहित्यविश्‍व: कविता महाजन : साहित्यवृक्षाचे अकाली गळलेले पान…

माधुरी तळवलकर 
कविता महाजन या लेखिकेला सप्टेंबर महिन्यातच एकावन्नावे वर्ष संपून बावन्नावे लागले. या चतुरस्त्र लेखिकेचे इतक्‍या अल्प वयात निधन होणे ही खरेच चटका लावणारी गोष्ट आहे. कविता महाजन यांची प्रतिभा इतकी बहुआयामी होती की, ती अनेक माध्यमांतून व्यक्‍त होत असे. त्या उत्तम चित्रकार होत्या, फोटोग्राफर होत्या, डीटीपी करीत असत. महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी संशोधन केले. सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या कवयित्री होत्या. त्यांनी उत्तमोत्तम पुस्तकांचे अनुवादही केले. काही पुस्तकांचे संपादन केले. लेखिका तर त्या होत्याच.
“ब्र’, “भिन्न’ या त्यांच्या कादंबऱ्या कधीही न विसरता येण्याजोग्या. त्यांच्या या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इतर भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले. कितीतरी विद्यार्थी त्यांच्या या कादंबऱ्यांवर एम.फिल व पीएच.डी करीत आहेत. एड्‌सबाधित रुग्णांसाठी त्यांनी खूप काम केले. कचराकुंडीजवळ पडलेली बाई स्वतःच्या हातांनी उचलून आणून तिची सेवा त्यांनी केली आहे. याच अनुभवांवर आधारित त्यांनी “भिन्न’ ही कादंबरी लिहिली. वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. तिथे काम करणारे या कादंबरीतले कार्यकर्ते प्रतीक्षा, कमल, लेनिना यांचे अनुभव आपल्या लक्षात राहतात. रचिताच्या तोंडून पेशंटची भूमिका सर्वस्वानं या कादंबरीत व्यक्त झाली आहे. हे इतकं आतून लिहिताना लेखिका त्या व्यक्‍त्तिमत्त्वांमध्ये केवढी एकरूप झाली असेल याची हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रचिती येते.
“ब्र’ ही कादंबरी तर पुष्कळ गाजली. समाजसेवी संस्थांमधले काम कसे चालते, यावर त्यांनी या कादंबरीत फार बारकाईने लिहिले आहे. महाराष्ट्रात राजकारणात स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्याची तेव्हा सुरुवात झाली होती. कविता महाजन यांनी गावोगावी हिंडून तिथली वस्तुस्थिती जाणून घेतली व त्या निरीक्षणांवरून त्यांनी “ब्र’ ही कादंबरी लिहिली. “तोंडातून “ब्र’ काढशील तर याद राख,’ असे ज्या स्त्रियांना बजावले जात होते, त्या जेव्हा सरपंच होत, तेव्हा त्यांना गावाचा कारभार सुखासुखी करता आला असेल का? किती अडथळ्यांना त्यांना तोंड द्यावे लागले असेल; याची खरीखुरी माहिती या ब्र पुस्तकावरून आपल्याला कळते. त्याखेरीज “ब्र’ कादंबरीत तळमळीचे कार्यकर्ते, ढोंगी संस्थाचालक व कार्यकर्ते यांचीही व्यक्तिचित्रे वाचायला मिळतात व एका वेगळ्याच जगाचे दर्शन आपल्याला होते.
कविता महाजन यांनी अनेक वृत्तपत्रांतून, साप्ताहिकांतून सदरं लिहिली. या लेखांमधील काही निवडक लेखांचे “ग्राफिटी वॉल’ नावाचे त्यांचे पुस्तक आहे. या लेखांमधले विचार, शैली, तळमळ, विषयांचं वैविध्य हे सारंच फार आवडण्यासारखं आहे. “साहित्यक्षेत्रातल्या अंधश्रद्धा’ या लेखात, अगदी बंडखोर मानले जाणारे संपादक, प्रकाशक तसेच स्वतः लेखक असणारे आणि सुजाण वाचकसुद्धा लेखनाच्या बाबतीत किती पूर्वग्रहांमध्ये अडकलेले असतात ते अनुभवांसहित त्यांनी दाखवून दिलं आहे. “ग्राफिटी वॉल’ या पुस्तकात कुठल्या ना कुठल्या निमित्तानं लेखिका सतत स्वतःचा शोध घेत असल्याचं जाणवतं. स्वतःला ती तपासून पाहते, सोलून काढते. लिहावंसं का वाटतं? दुःख, वेदना, आजार, दुरावे, नकार, मृत्यू… असं सारं लिहितानाही मनाला बरं का वाटत असावं? अशा अनेक गोष्टींवर मुक्त चिंतन करून ती प्रगल्भ विचार मांडते.
“कविता हीच माझी श्‍वास घेण्याची जागा आहे,’ असं त्या नेहमी म्हणत. “धुळीचा आवाज’, “तत्पुरुष’, “मृगजळीचा मासा’ या कवितासंग्रहातून त्यांची संवेदनशीलता आपल्या मनाला भिडते. कुहू हे त्यांचे पुस्तक दृश्‍यमाध्यमातही पाहता येते. फार आल्हाददायक पुस्तक आहे हे.
आत्महत्त्या केलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या बायकांना भेटून त्यावर महाजन यांनी सविस्तर संशोधनपर प्रबंध लिहिला. वारली लोकगीतांचा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. कोश व सूची वाङ्‌मय या विषयावर संशोधनात्मक पुस्तक लिहिले. मराठी वाङ्‌मयात मोलाची भर टाकणारे अफाट काम त्यांनी केले. इतक्‍या अल्प काळात त्यांनी दाखवलेले कर्तृत्व पाहून आपण नतमस्तक होतो. अशा बुद्धिमान, अभ्यासू लेखिकेला आणखी आयुष्य लाभले असते तर तिने आणखी केवढे तरी कार्य केले असते असे वाटते. साहित्यवृक्षावरील हे पान अकाली गळून गेल्याचे दुःख आणखी गडद होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)