सासवड-गराडे रस्त्याची दैना

सासवड- सासवड-गराडे रस्त्यावर मरीआई मंदिर ते रानमळा दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सासवड-गराडे रस्ता अतिशय अरुंद आहे. तसेच रस्त्यावरील ओढ्यावरती छोटा पुल बांधण्यात आला आहे. या पुलावर अनेक मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फात दाट झाडी आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे चालकांना वाहन चालविताना अंदाज येत नाही. त्यामुळे रोज किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने एकाच वेळी समोरासमोर आल्यास ती एकमेकांना घासली जाऊन अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झालेला असूनही रस्त्याचे काम का रखडलेले आहे याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. या मार्गावरच कोडीतचे प्रसिद्ध म्हस्कोबा देवस्थान आहे. दर रविवारी व अमावस्येला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात जाण्यासाठी भाविकांचा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
सासवड-गराडे रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच गराडे मार्गे जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. सासवड शहरालगतच असणाऱ्या या रस्त्याची झालेल्या दुरावस्थेतून सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा व कामचुकारपणा दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. पुरंदर तालुक्‍यातील ग्रामीण भागांच्या रस्त्यांची आधीच दुरावस्था झालेली आहे. सासवड-गराडे रोड सोबत शहरालगतच्या अन्य रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यानंतर ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्याच्या कडेची झाडे काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)