सावधान…त्वचा विकार वाढतोय!

रुपेश पाईकराव

पिंपरी – प्रदूषण, फास्ट फूड, सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे त्वचा विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) मागील पाच वर्षात रुग्णांनी घेतलेल्या उपचारावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. शहरवासियांनी “उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ हे लक्षात घेवून आधीच खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कामगारनगरी अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवड शहर आता “मेट्रो सिटी’च्या दिशेने झेप घेत आहे. शहराच्या लोकसंख्येने वीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबरच वाहनांचा वाढता वापर, झाडांची कमी होत चाललेली संख्या परिणामी वाढत असलेले कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण यामुळे प्रदूषण वाढतच चालले आहे. एकीकडे त्वचेवर बाहेरुन प्रदूषणाचा परिणाम होत असताना दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात पोषक घटकांऐवजी “फास्ट फूड’ जावू लागल्याने त्याचे विपरीत परिणाम त्वचेवर होत आहे. व्यायामाचा अभाव, पाणी पिण्याचे कमी प्रमाण यामुळे त्वचा विकार पसरण्यास हातभार लागत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मागील पाच वर्षाच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकला असता 2017-2018 या वर्षात त्वचा विकाराच्या रूग्ण संख्येत सुमारे सहा हजाराने वाढ झाल्याचे दिसते. या वर्षात 33 हजार 966 रूग्णांनी त्वचारोगावर उपचार घेतले. तर हेच प्रमाण 2016-17 मध्ये 27 हजार 870 एवढे होते. 2015-16 ला हे प्रमाण कमी झाले होते. परंतु, फार मोठी तफावत त्यामध्ये नव्हती. पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला आहे. शहरवासियांच्या आरोग्यावर शहराचे मानांकन अवलंबून आहे. शहरातील वाढती अस्वच्छता देखील त्वचा विकारास कारणीभूत ठरत असल्याचे मानले जात आहे. कचऱ्याने तुंबलेले नाले, उघड्यावर सोडले जाणारे सांडपाणी, जागोजागी आढळणारे कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता याचाही परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. एकूण शहराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नागरिकांबरोबरच महापालिकेने देखील उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्वचा विकारास कारणीभूत घटक, त्याचे दूष्परिणाम याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती करणे गरजेचे असल्याची अपेक्षा शहरवासीय व्यक्त करत आहेत.

त्वचा विकाराचे प्रकार – इसब, कंडू/कंडरोग, कोड, खरूज, त्वचेचा रंग बदलणे, मुरूमे, नायटा आदी.
त्वचेला संसर्ग झाल्याची लक्षणे – खाज निर्माण होते व कोंड्याची निर्मिती होते, त्वचेवर पुरळ पिटिका येणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेला दाह होणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचा लालसर होणे आदी.
उन्हाळ्यातील त्वचा विकार – नायटा, गजकर्ण, नखांना होणार बुरशीचा आजार, हात, मान ,चेहरा, कोपरा, पोटावरील त्वचेवर नायटा होऊ शकतात.

नायटा कसा ओळखायच्या?
त्वचेवर पाण्याचे फोड येतात, त्वचेची आग होते, खाजही येते. कपडे घट्ट झालेल्या ठिकाणी खाज येते, त्वचेवर जखमा होतात. नायटा हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे घरात एकाला झाल्यास त्याच्यावर त्वरीत उपचार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

त्वचा रोगाची मुख्य कारणे
“फास्ट फूड’चे सतत सेवन, त्वचेची अस्वच्छता ठेवणे, सतत, धूळ आणि प्रदुषणाच्या ठिकाणी थांबणे, त्वचेचा आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक, घाम आल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर त्वचा कोरडी न करणे, आहारात स्निग्ध पदार्थांचा अभाव, पाणी कमी पिणे आदी कारणामुळे त्वचा रोग होऊ शकतो, असे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)