सावत्र वडिलांची मारहाण; मुलीची आत्महत्या

मुलगी मोबाइल वापरत असल्याचा रागातून जीवे मारण्याची धमकी

पुणे – मोबाइल वापरत असल्याचे पाहिल्यानंतर सावत्र वडिलांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका 17 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरमध्ये 17 जानेवारी रोजी घडली. यात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावत्र वडिलांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेदिका बडदे (17, हांडेवाडी रोड, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती एका अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा करत होती. प्रीतम संजय बडदे (37, रा. हडपसर) असे आरोपीचे नाव असून, दीप्ती बडदे (36) यांनी फिर्याद दिली आहे.

दीप्ती यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यावर आरोपी प्रीतम बडदे यांनी तिला आसरा देण्याच्या बहाण्याचे तिच्याशी विवाह केला होता. तर वेदिका ही दीप्ती यांची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. प्रीतम याच्याशी त्यांचे लग्न 2006 साली झाले होते. विवाहानंतर प्रीतम हा दिप्ती व वेदिका या दोघींना त्रास देत होता. तो वेदिकाला स्वत:च्या मुलीप्रमाणे वागवत नव्हता. महाविद्यालयात गेल्यानंतरही त्याने वेदिकाला मोबाइल घेऊन दिला नव्हता. यामुळे वेदिका अनेकदा सावत्र वडिलांची नजर चुकवून त्यांचा मोबाइल वापरत होती. मात्र, प्रीतम तिला मोबाइल वापरू देत नव्हता. मुलीने मोबाइल वापरला, तर ती गैरप्रकार करेल असा त्याचा समज होता.

दरम्यान, 16 जानेवारी रोजी त्याला नकळत वेदिका त्याचा मोबाइल वापरत असल्याचे दिसले. त्यावर त्याने तिला दुकानासमोर सर्वासमक्ष मारहाण केली. तसेच “पुन्हा मोबाइल दिसल्यास मर्डर करेल,’ अशी धमकी दिली होती. मारहाण व सर्वासमक्ष अपमानामुळे वेदिकाने दि.17 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तसेच प्रीतमने फिर्यादी दीप्ती यांच्या परवानगीशिवाय दुसरा विवाहसुद्धा केला आहे. तो दीप्ती यांच्यावरही संशय घेऊन त्यांना मारहाण करत होता. प्रीतम याने नुकतेच कापड दुकान सुरू केले होते. दीप्ती व प्रीतम हे दोघेही ते दुकान संभाळत होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. राऊत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)