सायलीच्या धाडसामुळेच चोरटे गजाआड!

 

पाठलागाची कथा सांगत श्रेय लाटण्यासाठी मात्र शाहूपुरी पोलिसांची धडपड

प्रशांत जाधव

सातारा.दि. 26
सातारा शहरात गेल्या आठवड्यात दुचाकी चोरणारी टोळी शाहूपुरी पोलिसांनी प्रचंड वेळ पाठलाग करून पकडल्याचे सांगण्यात आले. मात्र, सत्य जरा वेगळेच आहे. कारण साताऱ्यातील सायली त्रिंबके या युवतीने मोठ्या धाडसाने चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अन्‌ त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पुढील संशयित निष्पन्न केले होते. असे करताना शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाला त्या युवतीला थोडे तरी श्रेय द्यावे असे वाटले नाही. उलटपक्षी काही जणांनी तर आम्ही कसा पाठलाग केला, याची चित्तरकथा रंगवून सांगण्यात धन्यता मानली. शाहूपुरी पोलीसांची ही कृती म्हणजे “”बेगानी शादी मे अब्दुला दिवाना” अशीच असल्याचे बोलले जात आहे.

सातारा पोलीस खरच सध्या चांगल्या पध्दतीने काम करत आहेत, हे मान्य करून त्यांचे कौतुकही करायला पाहिजेच. पण जसे जनतेने अन्‌ माध्यमांनी पोलिसांचे कौतुक करायला पाहिजे तसेच पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करायला हवा. एक युवती कोणत्याही परिणामाची तमा न करता मध्यरात्री आपल्या घराबाहेर येऊन पाच चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यातील एका चोरट्याला पकडते.

त्यानंतर शाहूपुरी पोलीसांच्या “पीसीआर’ व्हॅनला फोन करून घटना कळवते अन्‌ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्या संशयिताला ताब्यात घेतात. असे असताना पोलीस मात्र, त्या युवतीचा सन्मान करायचे सोडून प्रतापगंज पेठ ते राजवाडा या रोडवर आम्ही पाठलाग करून संशयितांना पकडल्याच्या भाकड कथा सांगत असतील तर अशाने यापुढे पोलिसांच्या मदतीला कोणी येण्याचे धाडस करेल असे वाटत नाही.

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल नऊ दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दोघांना अटक केली. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. साताऱ्यातील एका युवतीमुळे चोरट्यांची माहिती मिळाल्यानेच टोळी गजाआड झाली. शाहूपुरी पोलीसांनी पाठलाग करत चोरटे पकडले, असे काहीच घडले नाही. तर यामागची कहाणी अशी आहे.

मंगळवारी दि. 23 रोजी रात्री काही कामानिमित्त उशिर झाल्याने सायली त्रिंबके या त्यांच्या पार्लरमध्येच झोपी गेल्या. मध्यरात्री उशिरा त्यांना पार्लरबाहेर काहीतरी आवाज आल्याने उठून पाहिले असता बाहेर अंदाजे चार ते पाच चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. त्यांच्यातील संवाद ऐकून त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या काही नातेवाईक व मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले.

त्यानंतर धाडसाने शटर उघडून चोरट्यांचा पाठलाग करत त्यातील एका अल्पवयीन मुलास पकडले. त्यानंतर तातडीने पीसीआरला फोन केल्यानंतर पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास त्या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्यानंतर अल्पवयीन संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाईची सूत्रे गतिमान करत शाहूपुरी पोलिसांनी टोळी जेरबंद केली.

एका संशयिंतानंतर बाकीच्या संशयितांपर्यंत पोहचण्याचे काम पोलिसांनीच केले. बाकी घटनांमध्येही पोलीस चांगल्या पध्दतीने काम करत असतात त्या-त्या वेळी त्यांचे कौतुकही केले आहे. मात्र, एक युवती आपल्या जिवाची पर्वा न करता चोरट्याला पकडते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत त्या चोरट्याला थांबवून ठेवते. मग त्या युवतीचे कौतुक व्हायला पाहिजे की नको याचा शाहूपुरी पोलिसांनीच विचार करावा. कारण पोलीस आणि जनता सतर्क असली की गंभीर गुन्ह्यावर मात मिळवता येते. अन् असे झाले तरच पोलिस व जनतेतील संवाद वाढू शकेल.

 

… सायलीचा सन्मान करू
सायली त्रिंबके या युवतीने मोठ्या धाडसाने एक अल्पवयीन संशयित पकडून त्याची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बाकीचे संशयित शोधण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या युवतीने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन तिचा सन्मान करू.
                                                      – मुगुट पाटील (पोलीस निरीक्षक, शाहूपुरी)

100 नंबर कायम व्यस्त
मी चोरट्याचा पाठलाग करुन पकडल्यानंतर पोलिसांना कळवण्यासाठी बर्‍याचदा पोलीस हेल्पलाइन असलेल्या 100 नंबरला फोन केला. मात्र, मध्यरात्री सव्वा दोनची वेळ असूनही हा नंबर व्यस्तच लागत होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात फोन करुन कळवल्याने काही वेळातच शाहूपुरी पोलीस ठाण्याची पीसीआर दाखल झाली.
                                                                                   -सायली त्रिंबके, सातारा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)