सायना व सिंधू यांची  उपान्त्यपूर्व फेरीत धडक

जकार्ता, दि. 25 – रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल या भारतीय खेळाडूंनी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये मात करताना आशियाई क्रीडास्पर्धेतील महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

ऑलिम्पिकपाठोपाठ दोन जागतिक स्पर्धांमध्ये रौप्यपदके जिंकून भारताची सर्वाधिक यशस्वी महिला बॅडमिंटनपटू बनलेल्या सिंधूला जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मेरिस्कावर मात करण्यासाठी केवळ 35 मिनिटे पुरेशी ठरली. महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या लढतीत सिंधूने मेरिस्काचे आव्हान 21-12, 21-15 असे मोडून काढताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये सहज स्थान मिळविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या पहिल्याच एकेरी सामन्यात व्हिएतनामच्या वू थी ट्रॅंगविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागलेल्या सिंधूच्या या एकतर्फी विजयामुळे तिला सूर गवसल्याचे दिसत आहे. दरम्यान पहिल्या फेरीत इराणच्या अघाजिघाचा धुव्वा उडविणाऱ्या सायना नेहवालनेही इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानीचा प्रतिकार 21-6, 21-14 असा मोडून काढला. विश्‍वक्रमवारीत 40व्या स्थानावर असलेल्या फित्रियानीला घरच्या मैदानावर खेळत असल्याने प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा लाभला. परंतु सायनाने तिला प्रतिकाराची फारशी संधीच दिली नाही.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील भारताची सर्वाधिक अनुभवी खेळाडू असलेल्या सायनासमोर उपान्त्यपूर्व फेरीत थायलंडची चतुर्थ मानांकित रत्चानोक इन्तेनॉन किंवा कोरियाची अग्रमानांकित संग जि हयुन यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. तर त्याच वेळी सिंधूला श्रीलंकेची काविडी सिरिमनागे किंवा थायलंडची निचाओन जिंदापोन यांच्यातील विजयी खेळाडूशी झुंज द्यावी लागेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)