सायना, प्रणय यांची उपान्त्य फेरीत धडक

   आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

वुहान – भारताची अनुभवी खेळाडू सायना नेहवालने राष्ट्रकुल स्पर्धेपासून सुरू असलेली घोडदौड कायम राखताना येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच एच. एस. प्रणयनेही द्वितीय मानांकित खेळाडूवर खळबळजनक मात करताना पुरुष एकेरीची उपान्त्य फेरी गाठली. मात्र अग्रमानांकित किदंबी श्रीकांत आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

त्याआधी साई प्रणीथचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले होते.राष्ट्रकुल सुवर्ण विजेत्या सायना नेहवालने उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या बिगरमानांकित ली जॅंग मेई हिचे कडवे आव्हान 21-15, 21-13 असे सुमारे 43 मिनिचे रंगलेल्या लढतीत मोडून काढत उपान्त्य फेरीत धडक मारली. सायनाने त्याआधी पहिल्या फेरीत सिंगापूरच्या येओ जा मिनचा, तर दुसऱ्या फेरीत चीनच्या गाओ फॅंगजी हिचा पराभव केला होता. तर ली जॅंगने दुसऱ्या फेरीत थायलंडच्या चतुर्थ मानांकित रत्चानोक इन्तेनॉनवर सनसनाटी मात केली होती.

आता सायनासमोर उपान्त्य फेरीत तेैपई चीनच्या अग्रमानांकित तेई त्झु यिंगचे आव्हान आहे. यिंगने दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत चीनच्या आठव्या मानांकित हे बिंगजियावचे आव्हान 21-14, 21-9 असे सहज मोडून काढले. तृतीय मानांकित सिंधूने दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन शियाओजिनचे आव्हान सरळ गेममध्ये मोडून काढले होते. परंतु उपान्त्यपूर्व लढतीत तिला कोरियाच्या सातव्या मानांकित संग जि हयुनविरुद्ध 19-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. घोट्याच्या दुखापतीतून अद्याप सावरत असलेल्या सिंधूने 16-12 अशा आघाडीनंतर पहिली गेम गमावली. दुसऱ्या गेममध्ये तिला संधीच मिळाली नाही.

    प्रणयचा सनसनाटी विजय

भारताच्या प्रणयने कोरियाच्या द्वितीय मानांकित सोन वान हो याच्यावर 18-21, 23-21, 21-12 अशी एक तास 12 मिनिटांच्या प्रदीर्घ लढतीनंतर सनसनाटी मात करताना उपान्त्य फेरीत स्थान मिळविले. प्रणयसमोर आता चीनच्या तृतीय मानांकित चेन लोंगचे आव्हान आहे. चेन लोंगने हॉंगकॉंगच्या का लोंग अँगसची कडवी झुंज 22-24, 21-15, 21-17 अशी संपुष्टात आणताना आगेकूच केली. दरम्यान अग्रमानांकित किदंबी श्रीकांतचा पराभव भारतासाठी धक्‍कादायक ठरला.

मलेशियाच्या पाचव्या मानांकित ली चोंग वेईने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना श्रीकांतचे आव्हान 21-12, 21-15 असे केवळ 31 मिनिटांत संपुष्टात आणले. श्रीकांतने ली चोंग वेईला पराभूत करून भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच गेल्या वर्षभरात श्रीकांतने त्याला तीन वेळा पराभूत केले होते. परंतु आजचा दिवस श्रीकांतचा नव्हता.

   दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

महिला व पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. महिला दुहेरीत मेघना जक्‍कमपुडी व पूर्विशा राम या भारतीय जोडीला दुसऱ्या फेरीत पी. देचापोल व टी. सॅपसिरी या थायलंडच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध केवळ 23 मिनिटांत 8-21, 9-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

तसेच पुरुष दुहेरीत ली जुनहुई आणि लियू युचेन या चीनच्या अग्रमानांकित जोडीने एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्‍लोक या भारतीय जोडीचा 21-11, 21-19 असा 29 मिनिटांत पराभव केला. मात्र अननुभवी भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये अग्रमानांकित जोडीला कडवी झुंज देत सर्वांची मने जिंकली. त्याआधी मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख, वेंकट गौरव व जुही देवगण आणि रोहन कपूर व कुहू गर्ग या भारतीय जोड्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)