सायना नेहवालची विजयी सलामी ; समीर वर्मा, वैष्णवी रेड्डीचे आव्हान संपुष्टात 

कोरिया ओपन वर्ल्ड टूर बॅडमिंटन स्पर्धा 
सेऊल: भारताची अनुभवी खेळाडू सायना नेहवालने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सरळ गेममध्ये एकतर्फी मात करताना येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. परंतु स्टार खेळाडू समीर वर्मा आणि उदयोन्मुख खेळाडू वैष्णवी रेड्डीचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
या स्पर्धेत पाचवे मानांकन देण्यात आलेल्या सायना नेहवालने महिला एकेरीतील सलामीच्या लढतीत कोरियाच्या किम हयो मिन हिचा 21-12, 21-11 असा केवळ 40 मिनिटांत पराभव करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली. सायनासमोर आता कोरियाच्याच बिगरमानांकित किम गा इयुनचे आव्हान आहे. किमने पहिल्या फेरीच्या सामन्यात आपल्याच देशाच्या ली से येऊन हिची कडवी झुंज 21-10, 14-21, 21-18 अशी मोडून काढताना विजयी सलामी दिली. महिला एकेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत सायनाची लढत जपानच्या तृतीय मानांकित नोझोमी ओकुहाराशी होण्याची शक्‍यता आहे.
समीर वर्माच्या सातत्याबद्दल घेण्यात येणाऱ्या शंका रास्त असल्याचे आज स्पष्ट झाले. तंदुरुस्त असताना त्याने अनेकदा चमकदार कामगिरी केली असली, तरी दुखापतग्रस्त असताना तो अपयशीच ठरला आहे. आजही पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ऍन्टोन्सेनविरुद्ध पहिली गेम जिंकल्यावर समीरची लय तुटली आणि त्याला 21-15, 16-21, 7-21 असा पराभ” पत्करावा लागला. ही लढत तब्बल 58 मिनिटे रंगली.
तसेच भारताची युवा खेळाडू वैष्णवी रेड्डीला मात्र सलामीच्या फेरीत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित बेईवान झांगविरुद्ध दणदणीत पराभव पत्करावा लागला. झांगने वैष्णवीचे आव्हान 21-10, 21-9 असे जेमतेम 20 मिनिटांत संपुष्टात आणले. झांगसमोर आता हॉंगकॉंगची केई यानयान आणि मलेशियाची पेई यु पो यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.
दरम्यान, अजय जयराम, वैदेही चौधरी व मुग्धा आग्रे या भारतीय खेळाडूंना आपापल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागल्यामुळे या तीन भारतीय खेळाडूंना मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही. अजय जयरामला चीनच्या झाओ जुनपेंगविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तर महिला एकेरीत वैदेही चौधरी व मुग्धा आग्रे यांना एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक स्पर्धेतील रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि स्टार पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांत यांच्या गैरहजेरीत समीर वर्माही सलामीलाच पराभूत झाल्यामुळे या स्पर्धेत भारताचे यश सायना नेहवालवरच अवलंबून आहे. सिंधू आणि श्रीकांत यांनी गेल्या सलग दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असल्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)