साद-पडसाद: मतदानाचा घटनादत्त अधिकार चुकवू नका

संग्रहित छायाचित्र..

जयेश राणे

‘मतदान’ या विषयापासून अनेक नागरिक अंतर ठेवून असतात. मतदान हा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला घटनादत्त मूलभूत अधिकार आहे आणि तो बजावणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. या कर्तव्यात कुठेही कसूर राहता कामा नये. याची सर्वतोपरी दक्षता घेणे हीदेखील आपलीच नैतिक जबाबदारी आहे.

सुमारे 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशाचा नागरिक म्हणून या नैतिक जबाबदारीविषयी अधिक सतर्क असायला पाहिजे. राष्ट्रीय मतदार दिन नुकताच पार पडला असला तरी मतदानाचे गांभीर्य टिकून राहणे महत्त्वाचे आहे. वर्ष 2019 हे निवडणूक वर्ष आहे, हे लक्षात घेऊया !

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायत ते लोकसभा यांमध्ये जे विविध टप्पे येतात त्या प्रत्येक टप्प्यावर मतदानाचा हक्‍क बजावण्याची अमूल्य संधी प्रत्येक नागरिकाला मिळत असते. मतदार सूचीमध्ये (यादी) मतदारांचे नाव असणे, त्या सूचीतून नाव गहाळ झालेले असणे, सूचीत नाव असल्यास कुठेतरी चुका असणे आदी गोष्टी मतदार सूचीविषयी लक्षात येत असतात. मतदान करण्याची तीव्र इच्छा आहे. मतदान सूचीत आधीच्या निवडणुकीत नाव होते. मात्र आता ते नाही; असा प्रकारही होत असतो. यामुळे नाराज होऊन घरी परताव्या लागणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या हक्‍कापासून वंचित राहावे लागते. अशा नागरिकांच्या कळकळीची नोंद घेतली जाते का? मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर गर्दी असते. मतदानाच्या आधी काही दिवस मतदान केंद्र, मतदार सूचीतील क्रमांक आदी माहिती असलेल्या चिठ्ठ्या घरोघरी वाटल्या जातात. त्या चिठ्ठ्या कधी घरातील सर्व सदस्यांच्या नावे असतात, तर कधी काही सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्याच येत नाही. आपले यादीमध्ये नाव आहे का? हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी असे नागरिक धडपड करत असतात. काही वेळेस त्यांचे नाव दुसऱ्याच विभागात गेलेले असते. आपले अमूल्य मत देण्यासाठी नागरिकांना अशा प्रकारच्या दिव्यातूनही जावे लागते, याचीही नोंद घेतली पाहिजे.

भ्रष्टाचार, पारदर्शक कारभार, गतिमानता या मुद्द्यांवर शासन-प्रशासन यांत बदल होत नाही म्हणून मतदान टाळणाराही वर्ग देशात आहे. ज्या गोष्टींचा समाजाला त्रास होत असतो तो दूर करण्यासाठी शासन-प्रशासन यांवर अंकुश असला पाहिजे आणि तो ठेवणे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. वरील त्रासदायक मुद्द्यांमुळे समाज विशेष वैतागलेला आहे, हे सत्य आहे. म्हणून हातावर हात ठेवून समोर जे घडत आहे, ते केवळ मूकपणे पाहातच बसायचे का? हाताची घडी उघडून त्याचा उपयोग मतदानासाठी केला पाहिजे. उमेदवार योग्य न वाटल्यास “नोटा’चा पर्यायही दिलेला आहेच. त्याचा उपयोग करू शकतो. पण मतदानाला न जाता घरी बसून राहात व्यवस्थेवर केवळ कोरडे ताशेरे ओढणे योग्य नाही. त्या व्यवस्थेचा भाग असलेल्या निवडणूक प्रक्रियेत आवर्जून सहभागी झाले पाहिजे. या प्रक्रियेपासून अलिप्त राहून प्रश्‍न सुटणार नाही. प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.

देशामध्ये युवा नागरिकांची संख्या अधिक आहे. समाजामध्ये काय घडत आहे ? कोणती गोष्ट अयोग्य प्रकारे समाजासमोर मांडली जात आहे ? आदी गोष्टींकडे युवा पिढीने चौकसपणे पाहण्यास शिकले पाहिजे आणि नेहमी सत्याच्याच बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे. असत्य हे फार काळ टिकत नसते. कारण त्याचे पितळ भविष्यात कधीतरी उघडे पडतच असते. त्यामुळे आपण असत्याच्या बाजूने उभे राहून अमूल्य वेळ वाया घालवला, याचा शोक करण्याची वेळ नंतर येणार नाही, याची काळजी घेणे अनिवार्य आहे. मतदानाच्या दिवसासह इतरही वेळी या मुद्द्यांचा लाभ होत असतो.

पथनाट्य, मानवी साखळी करून आवाहन करणे आदी माध्यमांतून मतदान करण्याविषयी आवाहन केले जाते. या गोष्टीचे कौतुक करणारे, चेष्टा करणारे अशा दोन्ही प्रकारचे नागरिक असतात. चेष्टा करणाऱ्यांना स्वतः काही करायचे नसते आणि दुसरा चांगले काही करत असेल तर त्याची खिल्ली उडवण्याशिवाय त्यांना काही जमत नसते. म्हणजे त्यांचे कर्तृत्व काय ? तर काहीच नाही ! त्यांची पाटी कोरीच असते. अशा प्रकारे पाटी कोरी ठेवणाऱ्यांचा व्यवस्थेविषयी किती अभ्यास असेल? चार माणसे एकत्र येऊन काय आवाहन करत आहेत? त्यांना कोणता संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे? हे साधे प्रश्‍नही जाणून घेण्याची उत्सुकता, आवड, चिकित्सकपणा नसणे दुर्दैवी आहे.

युवा मतदारांत प्रतिवर्षी वाढ होत असते. त्यांनी आपली नोंदणी मतदार सूचीत करणे आवश्‍यक आहे. नोदणी झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीपासून मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावण्यास आरंभ केला पाहिजे. “मतदान करा’ असे कोणी सांगण्याची वेळ येता कामा नये. मतदान केल्यावर कर्तव्य संपले असे नाही, तर निवडून आलेल्या सरकारला वेळोवेळी त्यांच्या चुकांची योग्यप्रकारे जाणीवही करून दिली पाहिजे. यातून सरकारवर मतदारराजाचा अंकुश प्रस्थापित होत असतो. युवा पिढीकडे देशाचे भविष्य म्हणून पाहिले जाते. नोकरी-व्यवसाय-शिक्षण या चौकटीच्या बाहेर पडून शासन-प्रशासन यांवर अंकुश ठेवण्यासाठीही पावले टाकली पाहिजे.

मतदानाविषयी शालेय स्तरापासून जागरुकता निर्माण करणे आवश्‍यक आहे. मतदान करण्यास सांगणे, त्याचे महत्त्व पटवून देणे हा काही राजकीय विषय नाही. विद्यार्थ्याला आपल्या हक्‍काची जाणीव करून देणे आवश्‍यक असते. यासह त्याचा उपयोग कसा करता येईल याचेही मार्गदर्शन झाले पाहिजे. शिक्षकांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा संस्कार होणे सोपे जाईल. घरातील मोठी मंडळी मतदान करण्यासाठी जातात. “उद्या तुलाही आमच्यासह यावे लागणार आहे’, ही जाणीव ज्येष्ठ मंडळींनी बालकांना करून दिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)