साताऱ्यात तुफान दगडफेक

आंदोलनाला हिंसक वळण:एसपींसह पोलीस जखमी

जमावाला पांगवण्यासाठी
लाठीमार,अश्रुधुराचा वापर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात
तीन तास जोरदार धुमश्‍चक्री

दुकानांच्या,वाहनांच्या
काचा फोडल्या

सातारा,दि.25 प्रतिनिधी- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी झालेल्या आंदोलनाला साताऱ्यात हिंसक वळण लागले.आंदोलनकर्त्या जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी व माध्यम प्रतिनिधी जखमी झाले. जमावाला रोखण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न करत दगडफेक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. दरम्यान, हिंसक आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.
बुधवारी सकाळी मराठा समाजाचा मोर्चा शांततेत राजवाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. मोर्चा तेथे पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांमधील युवकांनी घोषणा देवून आमदार व समन्वयकांच्या भाषणांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील केला. समन्वयकांनी वारंवार सांगून देखील ते मोर्चेकरी शांत रहिले नाहीत.त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देवून आंदोलनाची सांगता करण्याचा निर्णय समन्वयक घेणार होते. शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले असताना मोर्चेकऱ्यांमधील युवकांचे एकापाठोपाठ एक गट कोरेगावच्या दिशेने पुणे-बॅंगलोर महामार्गाकडे रवाना होवू लागले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना दहा मिनिटांनी माहिती मिळाली की ते युवक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. माहितीनुसार ते बॉम्बे रेस्टॉरंटरच्या पुलावर दाखल झाले व त्यांच्या पाठोपाठ मोर्चाचे समन्वयक देखील तेथे दाखल झाले. पोलीस व समन्वयक मोर्चेकऱ्यांना महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती करत होते. चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस अधिक्षक संदीप पाटील दाखल झाले. त्यांनी देखील आंदोलनकर्त्यांना महामार्ग न रोखण्याची विनंती करत असताना अचानक आंदोलनकर्त्यांमधील एका गटाने थेट दगडफेकच करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सर्वांची एकच पळापळ सुरू झाली. पोलीसांनी दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केल्यानंतर गाडीच्या दिशेने निघालेल्या एसपींच्या वाहनावर तसेच हातावर दगड लागला त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या संख्यने असलेल्या जमावाचा पोलीसांवर दगडफेक ही सुरूच होती. तसेच पुलाच्या खालून देखील पोलीसांवर दगडफेक सुरू होती. दगडफेकीत पोलीस जखमी झाले त्याबरोबर वाहनांच्या काचा देखील फुटल्या. अखेर पोलीसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचे अस्त्र बाहेर काढत अश्रुधुरांच्या सात ते आठ नळकांड्या बंदुकीव्दारे जमावाच्या मध्यभागी सोडून जमाव पांगवला. जमाव पांगवताना त्यांनी लाठीचार्ज देखील केला.
अश्रुधुरांच्या कांड्यांचा एका पाठोपाठ एक मारा होत असल्यामुळे जमाव महामार्गावरील पुलावरून पांगला गेला. तो जमाव बॉम्बे रेस्टॉरंटच्या पोवई नाका व कोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाकडे पांगला गेला. मात्र, काही वेळातच पोवई नाक्‍याच्या दिशेला थांबलेल्या जमावाने पुलाखाली थांबलेल्या पोलीसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. दगडफेक तब्बल अर्धा तास सुरू होती मात्र पुढे दगडफेकीचे लक्ष्य पोलीसांचे वाहनांवर करण्यात आल्यानंतर पोलीसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. मात्र, जमाव नळकांड्यांना जुमानत नव्हता उलट अधिक तीव्रतेने दगडफेक करू लागला. अखेर पोलीसांनी जमावावर चाल केली. चाल करताना जमावातील अनेक जण मिळले त्या मार्गाने पळून जात होते. पोलीसांनी मात्र जमावाचा जिल्हापरिषदेपर्यत पिछा सोडला नाही. त्यामुळे अनेक आंदोलनकर्ते गायब झाले तर जे सापडले त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेण्यात येत होते.
पोवईनाक्‍याच्या दिशेने पोलीसांची जमावकर्त्यांना पांगवत असताना दुसऱ्या बाजूला कोरेगावच्या दिशेने बॉम्बे रेस्टॉरंटपासून 400 मीटर अंतरावर थांबलेल्या जमावाने दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यावेळी बॉम्बे रेस्टॉंरट पुलाखाली मोजके हेल्मेटधारी पोलीस कर्मचारी होते मात्र त्यांच्या सोबतीला एलसीबी तथा स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची टीम होती. पोलीस व एलसीबीने जमावाला पांगवण्यासाठी उलटी दगडफेक करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करित होते. मात्र, तरी देखील पांगण्याचा नाव घेत नव्हता. अखेर एलसीबीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हेल्मेट व ढाल हातात नसताना व पुढून गोळीबाराप्रमाणे दगडफेक सुरू असताना जमावावर चाल केली. चाल करताना त्यांनी शक्‍य तेवढ्या गतीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी बहुतांश जण पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र दगडफेक करणाऱ्यापैकी प्रमुख मोहरे पकडून आणत पोलीस चौकीत दाखल केले. दरम्यान, दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेली दगडफेक ही तीन वाजेपर्यत सुरू होती. मात्र, त्यानंतर पोलीसांनी धरपकड करण्यास गती वाढवल्याने बॉंम्बे रेस्टॉरंट परिसरातील जमाव पुर्णत: पांगला गेला होता. तर चार वाजण्याच्या सूमारास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतील त्यानंतर पोलीस अधिक्षक संदीप पाटील व काहीवेळात पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून सद्यस्थितीतचा आढावा अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार व पो.नि.पद्माकर घनवट यांच्याकडून घेतला. सायंकाळ साडे पाच वाजल्यानंतर घटनास्थाळावर तसेच सातारा शहरातील संवेदनशील ठीकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

समाजकंटकांचा तपास सुरू : नांगरे-पाटील
मोर्चा दरम्यान काही समाजकंटक घुसले व त्यांच्याकडून हा प्रकार घडला असून त्यांचा तपास आम्ही करणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षिक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. तसेच दगडफेक करणाऱ्यांमध्ये बहुतांश युवक असल्याबाबत ते म्हणाले पोलीस शक्‍य तेवढे युवकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करित आहेत. युवकांनी ही सोशल मिडीयावर आलेल्या मेसेजची खात्री करूनच तो फॉरवर्ड करायला हवा. तर पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी झाल्याबाबत ते म्हणाले, पोलीस दलाचे प्रमुख म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक पाठबळ वाढावे या हेतूने ते घटनास्थळी गेले होते. तसेच अशा घटनांवेळी पोलीस अधिक्षकांनी लीड करणे देखील महत्वाचे असते असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

घटनेची सखोल चौकशी करा: क्षीरसागर
जमावाने केलेल्या दगडफेकीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बापू क्षीरसागर यांनी केली. गेली दोन वर्ष मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना असा अनुचित प्रकार एकदाही घडलेला नाही. आज जी मुले दगडफेक करत होती ती क्रांती मोर्चाशी संबधित नाहीत. त्या मुलांना आजपर्यंत कधी ही पाहिलेले नाही. उलट महामार्गावर आंदोलन करताना त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट माझ्या अंगावर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असे क्षिरसागर यांनी सांगितले.

माझ्यावरील हल्ला सिरीयस गोष्ट नाही: पाटील
सातारा पोलीस दलाच्या इतिहासात पोलीस अधिक्षकांवर आंदोलनकर्त्यांकडून हल्ला होण्याची पाहिली वेळ होती. या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, कायदा सुव्यस्था राखताना असे प्रकार होत असतात. ही गोष्ट सिरीयस नाही. कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे पहिले काम आहे. त्यामुळेच कमी बळाचा वापर करून परिस्थिती हाताळता आली. नागरिकांनी ही अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच भीती बाळगू नये. प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)