सातारा : स्थलांतराच्या घाईने अनेक प्रश्‍नांना जन्म

विशाल गुजर

पुनर्वसनाच्या आधी सुविधा देण्याच्या नावाने शासनाचा शिमगा

परळी – उरमोडी धरणग्रस्तांच्या व्यथांना खरा प्रारंभ त्यांच्या पाठीमागे शासनाला लावलेल्या स्थलांतराच्या घाईमुळे झाला आहे. मुळात पुनर्वसनाच्या आधी शंभर टक्के सुविधा देण्याचा नियम असताना हा नियमच पायदळी तुडवत आजअखेर अपवाद वगळता एकाही गावात सर्व सुविधांचा अभाव आहे. या सुविधांची यादी प्रचंड मोठी आहे.
मुळात उरमोडीच्या धरणग्रस्तांपैकी पहिल्या टप्प्यात ज्यांचे स्थलांतर झाले त्या गावांना पुनर्वसन झालेल्या ठिकाणी अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करावा लागला. अत्यंत सुपीक जमिनीतून त्यांना थेट खडकाळ, मुरमाड जमिनी देण्यात आल्या. प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात सर्वच धरणग्रस्तांना आलेला अनुभव त्यांनाही आला. मुळ मालकांनी उपऱ्या धरणग्रस्तांना आपल्या जमिनीत पाय टाकायलाही मज्जाव केला. याचा प्रत्यय आजही काही ठिकाणी येत आहे. अशा मूळ मालकांवर काहीही कारवाई न केल्याने त्यांचे धाडस वाढले. ज्यांना विनासायास कब्जा मिळाला. त्याठिकाणी पाण्याची बोंबाबोंब होती.

त्यामुळे पिकवणार काय? आणि खाणार काय? अशा खडतर परिस्थितीशी सामना करणाऱ्या अनेक धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाशी शासनाला काहीएक देणे-घेणे नाही हे आतापर्यंतच्या प्रशासनाच्या वागण्यातून निष्पन्न झालेले आहे. मोर्चे, आंदोलन, आमरण उपोषण याचे हत्त्यार उपसले की, तात्पुरत्या मागण्या मान्य करायच्या आणि आंदोलन संपले की पुन्हा पाढा वाचावयाचा.

पुनर्वसन झालेल्या गावांचे जे मुख्य प्रश्‍न आहेत त्यामध्ये प्राथमिक सुविधांचाच अभाव आहे. त्यातच काही गावांचे अंशत: पुनर्वसन झालेले आहे. आजही परळी खोऱ्यातील बनघर, कासारथळ, नित्रळ, पुनवडी, आरगडवाडी, दहिवडी, लुमणेखोल, कामथी या पुनर्वसन झालेल्या गावातील काही कुटुंबे पाणीसाठ्यापासून डोंगराच्या कडेला सरकून राहिली आहेत. या गावांच्या समस्या तर अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. प्रशासनाने या सर्व गावांची त्यांची चारी बाजूंनी प्रचंड कोंडी केलेली आहे. मुळात या गावात कसण्यासाठी योग्य अशी जमीन अत्यल्प आहे.
गावात असलेली पिढीजात टोलेजंग घरे सोडून अनेकांना दहा बाय दहाच्या खोलीत जीवन कंठावे लागत आहे. घरातील काही व्यक्ती पुनर्वसन झालेल्या ठिकाणी तर काही पोटापाण्याच्या उद्योगासाठी थेट मुंबई, पुणे अशा ठिकाणी गेल्याने नांदत्या घराचे तुकडे करण्याचे पाप प्रशासनाने केल्याचा आरोपही धरणग्रस्तांचा आहे. (क्रमश:)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)