सातारा : सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त

वाईत शहराची सुरक्षा रामभरोसे, प्रशासन सुस्त

वाई- दानशूर व्यक्ती तसेच काही सामाजिक संस्थांनी स्वखर्चातून वाई शहराच्या सुरक्षेसाठी शहरात विविध ठिकाणी बसविण्यासाठी 16 सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते. संबंधित प्रशासनाने हे कॅमेर बसविलेदेखील. यामुळे शहरातील गुन्हेगारीलाही मोठ्या प्रमाणात आळा बसला. मात्र, गत वर्षभरापासून देखभालीअभावी ही सीसीटीव्ही यंत्रण बंद अवस्थेत आहे. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाईत पुन्हा गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करुन पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरातीलच काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन दिले. हे कॅमेरे शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये तसेच मोक्‍याच्या ठिकाणी बसविण्यात आले होते. यामध्ये किसनवीर चौक, महागणपती चौक, चित्रा टॉकीज, शाहीर चौक, गंगापुरी, भाजी मंडई, वाई नगरपालिका परिसर, चावडी चौक, जामा मशिद, वाई एस. टी. स्टॅड, सह्याद्रीनगर स्टॉप, यासह विविध महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. यामुळे अनेक गुन्हे उघड ही होण्यास मदत होत होती व त्यामुळे गुन्हगारांना जरब बसत होती. परंतु, जवळपास वर्षभरापासून संपूर्ण शहरातील सी.सी.टी.व्ही यंत्रणा बंद पडली आहे. याबाबत नागरिकांमधून पालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

मात्र, याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चानी दिलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची साधी देखभालदेखील संबंधित यंत्रणा ठेवू शकत नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी ज्या यंत्रणेकडे दिली होती. त्या यंत्रणेला प्रशासनाकडून देखभालीसाठी खर्च न दिल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे, असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

दरम्यान, सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शहरातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीलाही आळा बसत होता. मात्र, आता गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच धुळखात पडल्याने शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने ही यंत्रणा सुरु करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)