सातारा शहरातील गणेश विसर्जनावर कायदेशीर पेच

मंगळवार तळ्यासाठी खा. उदयनराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडून कायद्यावर बोट
सातारा,  (प्रतिनिधी) – सातारा शहरातील श्री विसर्जनासाठी मंगळवार तळे आणि मोती तळ्यासाठी जनता जनार्दनाचा आग्रह होत असताना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सोमवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देवून पालिकेला फटकारले. या दोंन्ही तळ्यांमध्ये गणपती विसर्जनाला त्यांनी परवानगी नाकारून कोर्टाकडून तसा निर्णय घेऊन या या शब्दात सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांना कानपिचक्‍या दिल्या. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नकार मिळाल्यामुळे खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलने विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार अशी आक्रमक भुमिका घेतली. परिणामी दोंन्ही प्रशासनामध्ये कायदेशीर पेच उभा राहिला असून या संघर्षजन्य परिस्थितीवर सातारा पालिकेत मंगळवारी तातडीची सभा बोलवण्याची गडबड सुरू झाली होती.
सातारा शहरातील गणेश मंडळांनी पालिकेच्या बैठकीत उत्स्फूर्तरित्या मंगळवार तळे व मोती तळे यांचीच मागणी विसर्जन मिरवणूकीसाठी केली. दीड तासाचा राजकीय खल झाल्यानंतर सर्व समन्वय समिती नेमून ती थेट खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेईल आणि मोती तळ्यासाठी परवानगी मागेल, असे ठरले होते. या पार्श्‍वभूमीवर या समितीने विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांच्या नेतृत्वाखाली उदयनराजे यांची भेट घेऊन सातारकरांची भावना त्यांच्यासमोर मांडली. आणि अनौपचारिक रित्या झालेल्या बैठकीत उदयनराजेंनी ही दोंन्ही तळी देण्याचे कबूल केले. मात्र, सोमवारी तळ्यांच्या कबूली नाम्याचा सरकारी अडथळा सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाला. भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांनी कृत्रिम तळ्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन सादर केले.

मंगळवार तळ्यासाठी उदयनराजे आग्रही
साताऱ्यात कोणत्याही प्रश्‍नावर उदयनराजे हेच अंतिम उत्तर असते, हे चित्र सोमवारी दिसून आले. मंगळवार तळे आणि मोती तळ्यासाठी परवानगी मिळावी अशी सुचना वजा विनंती खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना केली. मेडिकल कॉलेजच्या जागेसंदर्भात अद्यापही काही तांत्रिक परवानग्या बाकी आहेत, भिक्षेकरी गृहाच्या नजीकच्या सहा गुंठे जागेचा ताबा अद्यापही मिळालेला नाही. तसेच सातारा पालिकेच्या बजेटलाही मंजुरी मिळालेली नाही. अशा विविध प्रश्‍नावरून उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट विचारणा केली. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र मंगळवार तळ्याच्या प्रश्‍नावर त्यांनी थेट नकार दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात परवानगी दिली जाऊ शकत नाही. पालिकेला निर्णय घ्यायचा असल्यास त्यांनी कोर्टातून तशी परवानगी आणावी असे त्यांनी स्पष्ट केले. या नकारामुळे उदयनराजेंनी प्रसारमाध्यमासमोर आपल्या सिग्नेचर स्टाईलने जोरदार प्रतिक्रिया दिली. मंगळवार तळ्यात विसर्जनास मनाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिला. आधीचे पोलिस अधिक्षक रिसालदार तळ्यासाठी परवानगी देतात नंतरचे नाकारतात. आता कृत्रिम तळे खोदण्यासाठी वेळही कमी आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन मंगळवार तळ्यात विसर्जनाशिवाय पर्याय नाही अशी भुमिका आम्ही मांडली मात्र अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. तरीही विसर्जन होणार ते याच तळ्यांमध्ये या मागणीचा त्यांनी पुनर्रूच्चार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर मी रजेवर जातो
बैठकीतून उदयनराजे निघून गेल्यानंतर नगराध्यक्ष माधवी कदम व मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झडल्याचे दिसून आले. गेल्या वर्षभरात गणेश विसर्जनासाठी तुम्ही काय तयारी केली, असा थेट प्रश्‍न करून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गोरे यांची चांगलीच हजेरी घेतली. प्रत्येक वेळी माझ्याकडे विसर्जनाच्या अनुषंगाने तक्रारी दाखल होतात, त्यांना मी काय उत्तर द्यायची? हा नगरपालिका प्रशासनाचा विषय आहे. प्रत्येक वेळी माझ्याकडे तक्रारी येतात पण मी नगराध्यक्ष नाही अशी तीव्र नाराजी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही मुख्याधिकारी कोणत्याही गोष्टीची माहिती देत नाहीत अशी तक्रार केली. त्यावेळी नगराध्यक्षांचा जर माझ्यावर विश्‍वास नसेल तर मी रजेवर जातो असा धक्‍कादायक पवित्रा गोरे यांनी घेतल्याने सारेच आवाक्‌ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)