सातारा : वणव्यात दोन घरे खाक

मेढा- तापोळ्याजवळील महाबळेश्‍वर तालुक्‍यातील आहिरामुरा येथील दोन घरे वणव्यामुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाली आहेत. यामध्ये दोन जनावरांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. धान्य, कपडे, पैसे तसेच इतरही घरगुती साहित्य असे सुमारे दहा लाखाचे नुकसान या आगीत झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याचे प्रयत्न करत असताना कुटुंबातील दोन जण भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे.

बुधवारी दुपारी वाळणे गावाच्या हद्दीत वनविभागाच्या डोंगराला मोठा वणवा लागला होता. वाऱ्यामुळे ही आग अहिरामुरा गावापर्यंत पोहोचली. याठिकाणी मनाजी ठकू काळे यांच्यासह पाच भावांचे एकत्रित कुटुंब आहे. वणव्यामुळे लागलेल्या आगीत मनाजी काळे यांच्या घराजवळ असलेल्या गवताच्या गंजीने पेट घेतला. बघता बघता या आगीत काळे यांचे घरही जळू लागले. वणव्यामुळे घर पेटलेले लक्षात येताच कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरडाओरडा करत आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे एक घर पूर्णपणे तर दुसरे घर 80 टक्के जळून खाक झाले आहे. या आगीत घरातील धान्य, संसाराचे साहित्य, भांडी, कपडेलत्ता, पैसे असे सगळे जळून खाक झाले आहे. तसेच ही आग विझवताना जाईबाई राघू ढेबे व मनाजी ठकू काळे हे दोघेजण गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने सातारा व तिथून पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी तहसीलदार रमेश शेडगे, मंडल अधिकारी व तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष धोंडीबाशेठ धनावडे यांनीही जळीतग्रस्त कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार दिला तर व जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

डोंगरावर दुर्गम भागात राहणारी ही कुटुंबे असून अत्यंत गरीब आहेत. मिळणारी शासकीय मदत ही अत्यंत अल्प असते, या कुटुंबाला आता खाण्यासाठीही काही शिल्लक राहिले नाही तर उपचाराचा खर्च करायला पैसेही नाहीत. तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून या कुटुंबाना मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी.
धोंडीबाशेठ धनावडे, अध्यक्ष, तालुका समन्वय समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)