सातारा : सातारा पोलीस विभागाने सातारा पोलीस पब्लिक स्कूल या नावाने सीबीएसई पॅटर्न शाळा सुरु केली आहे. ही पोलीस विभागासाठी अभिमानाची गोष्ट असून या शाळेमुळे पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल. शाळेसाठी जास्तीत जास्त सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी आज दिले.
सातारा पोलीस पब्लिक स्कूल, पाळणाघराचे तसेच नुतनीकरण केलेल्या अलंकार हॉलचे उद्घाटन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, प्रेरणा कट्टे, कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, शाळेच्या मुख्याध्यापक तृप्ती वाणी आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा पोलीस पब्लिक स्कूल व पाळणाघाराचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शाळेची व पाळणाघराची पाहणी करुन जिल्हा पोलिस दलाचे अभिनंदन केले. पोलीस उपअधीक्षक प्ररेणा कट्टे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट पोलिस ठाण्यांचा गौरव
उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर पोलिस महासंचालक यांच्या हस्ते जिल्ह्यातील पाटण, दहिवडी, सातारा शहर, शाहुपूरी तळबीड, उंब्रज, कोयनानगर, फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, शिरवळ, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार, पुसेगाव, वडूज, म्हसवड, औंध या पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस स्टेशन प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा