सातारा : राष्ट्रवादीविरोधात भाजपची व्यूहरचना

संदीप राक्षे

पक्षाला बालेकिल्ल्यातच कोंडीत पकडण्यासाठी विविध मार्गांचा वापर

सातारा : राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच कोंडीत पकडण्यासाठी भाजपने वेगवेगळे हातखंडे वापरायला सुरवात केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा भाजपच्या कोअर टीमला लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या स्पष्ट लेखी सूचना दिल्या आहेत. मात्र सातारा लोकसभेचा उमेदवार कोण? यावर प्रचंड रहस्य असून नक्की प्रचार कोणाचा करायचा याबाबत कार्यकर्ते मात्र संभ्रमित आहे. राष्ट्रवादीच्या तंबूत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे. तरीसुध्दा तिकिट मलाच मिळणार या विषयी उदयनराजे प्रचंड ठाम आहेत. राष्ट्रवादी आणि उदयनराजे यांच्यातील आंतरविरोध आता अगदीच टोकाच्या वळणावर निघाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उदयनराजे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्र्यासह शरद पवार उपस्थित राहिले तरी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. साताऱ्यात राजधानी महोत्सवाचे आयोजन ही सुध्दा राजे समर्थकांची राजकीय पेरणीच होती. मात्र राजधानी महोत्सव अगदीच किरकोळीत निघाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा हा कार्यक्रम आपल्या डायरीतून काढून ठेवला. त्यामुळे उदयनराजे यांच्या दबावतंत्राला चांगलाच झटका बसला आहे. कर्नाटकच्या निकालांनी भाजपच्या अतिआत्मविश्वासाचे विमान जमिनीवर आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकांच्या राजकीय गणितांना कसे जुळवायचे हा मोठा प्रश्न आहे.

लोकसभेला महाराष्ट्रातून 250 खासदार आणि प. महाराष्ट्रातुन दोन डझनचा आकडा गाठायचे उद्दिष्ट आहे. त्यातच भाजप धुरीण उदयनराजे यांच्यासाठी भाजप रेड कार्पेट अंथरून बसला आहे. मात्र उदयनराजे यांनी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.

उमेदवाराचा सस्पेन्स मग प्रचार कोणाचा?
लोकसभेसाठी भाजपला स्वच्छ चेहयाचा पण तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. यासाठी पाटण चे तडफदार आमदार शंभूराजे देसाई यांना भाजपच्या तंबूत आणून त्यांना खासदारकीसाठी चुचकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकस प्रयत्न चालवले आहेत. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांचाही तार्किक प्रयोग राजकीय परिणाम लक्षात घेउन केला जाऊ शकतो. मात्र लोकसभेचा पुढील अकरा महिन्याचा संवेदनशील कालावधी लक्षात घेउन सातारा जिल्हयात भाजपची ‘वन बूथ टेन यूथची, बांधणी सुरू झाली आहे.

अगदी सातारा शहरातील 86 पैकी 45 बूथची प्रत्येकी पंचवीस कार्यकर्ते अशी रचना करण्यात आली. जनतेत जास्तीत जास्त मिसळून त्यांना भाजपकडे वळवणे त्यासाठी विविध योजनांचा रचनात्मक कार्यक्रम प्रदेश कार्यालयांकडून जिल्हा पातळीवर रवाना करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगलीच्या तुलनेने माण, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, कोरेगाव या साताऱ्यातील विधानसभा मतदारसंघांना राजकीय रसद पुरवणे चालूच ठेवले आहे. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सक्षम पर्याय अद्याप भाजपला सापडलेला नाही.

बुद्धिजीवी संमेलनांचा नवा पर्याय
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारला 4 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यासाठी प्रदेश कार्यालयातून सूचना आल्या होत्या, या कार्यक्रमाची आखणी, नियोजन करणे आणि विविध कार्यक्रमांसाठी जबाबदारी निश्‍चित करणे या साठी सातारा शहर आणि सातारा तालुका यांची एक महत्वाची संयुक्त बैठक झाली या बैठकीला भाजपा नेते दत्ताजी थोरात, सातारा जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, सातारा तालुकाध्यक्ष अभय पवार , सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, चिटणीस प्रवीण शहाणे,आशुतोष चौधरी, उपाध्यक्ष निलेश कदम, नगरसेवक आणि गटनेते मिलिंद काकडे, माजी गटनेते नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका सिद्धी पवार, आशा पंडित, नगरसेवक सागर पावशे, माजी नगरसेवक ऍड खामकर, वृक्ष कमिटी सदस्य धनंजय पाटील,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगीता भोसले, सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ निर्मला पाटील, उपाध्यक्ष सुनिशा शहा,  राजश्री दोषी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, सातारा तालुका सरचिटणीस श्री विवेक कदम, सातारा शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष चंद्रशेखर सासवडे, अनुसूचित मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कांबळे,युवराज मोरकर, अभय घोडके, अर्जुन कदम, अविनाश पवार, लक्ष्मण पटेल, विक्रम बोराटे, चंद्रकांत हादगे, राजू शेटे, हर्शल निकम सचिन गौड, भिलारे गुरुजी, गणेश पाखले हे उपस्थित होते

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे खालील कार्यक्रम राबवण्याचे ठरले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्यानी घेतला आहे अशा लाभार्थ्यांचे संमेलन भरवणे आणि त्यांची मनोगते सर्वाना ऐकवणे,

बुद्धिजीवी, साहित्यिक , कलाकारांचे संमेलन भरवणे,

अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये जाऊन विशेष संपर्क अभियान राबवणे

अनुसूचित जनजातीच्या गावांमध्ये ग्रामसभा, मेळावे भरवणे

सार्वजनिक स्थानी,महापुरुषांचे पुतळे व परिसरात, एक दिवसाचे स्वच्छता अभियान राबवणे आणि महापुरुषांचे पूजन करणे

बाईक रॅलीचे आयोजन करणे

वरिष्ठ नागरिक मेळावा आयोजित करणे 

बूथ मधील व्यक्तींशी संपर्क करणे

या सर्व गोष्टी करताना सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना सांगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)