सातारा : युवकांच्या टोळक्‍याकडून वाहकास मारहाण

वाई बसस्थानकातील प्रकार

मेणवली : अज्ञात युवकांच्या टोळक्‍याने वाहकास बसस्थानकात घुसून लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाई येथे घडली. या घटनेत वाहक जखमी झाल्याने त्याला वाईच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात एकही डॉक्‍टर नसल्याने त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची तक्रार घेण्यासाठी वाई पोलिसांकडूनही टाळाटाळ होत होती. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी ‘दैनिक प्रभात’शी संपर्क साधला. त्यानंतर प्रभातच्या पुढाकाराने आगारप्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्‍तींविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई आगाराचे वाहक अच्युत गोरे हे शनिवारी साताराहून साडेआठ वाजता निघणारी शटल गाडी घेऊन वाईला आले. यावेळी एसटीमध्ये एक महिला प्रवासी वाईला जाण्यासाठी बसली होती. तिला वाईच्या प्रवेशद्वारावरच उतरायचे होते. एसटी वाई प्रवेशद्वारावर आल्यानंतर वाहकाने त्यांना त्याठिकाणी उतरण्यास सांगितले. परंतु, त्यांना घेण्यासाठी कोणी नातेवाईक त्याठिकाणी आले नव्हते. तरीही थोडावेळ वाहकाने बस थांबवली शेवटी त्या महिला प्रवाशाला उतरवून एसटी वाई आगारात आली.

एसटी बसस्थानकात आल्यानंतर काहीवेळातच अज्ञात दहा ते बार युवकांचे टोळके त्याठिकाणी आले. त्या टोळक्‍याने वाहक अच्युत गोरे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते टोळके तेथुन पसार झाले. दरम्यान, मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)