सातारा : म्हसवड पालिकेत शिपाईच मुख्याधिकारी 

तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीच हाकताहेत पालिकेचा कारभार 
म्हसवड – विविध विभागांच्या दाखल्यांवर तसेच इतरही महत्वाच्या प्रकरणांवर पालिकेत शिपाई पदावर नियुक्त असलेले कर्मचारीच निर्णय देत आहेत. केवळ तोंडी निर्णयापुरते मर्यादित न राहता संबंधित कागदांवरही ते स्वत:च्याच स्वाक्षऱ्या ठोकत असल्याने पालिकेला कोणी जबाबदार वारस आहे का नाही, अशी चर्चा नागरिकांमधून सुरु झाली आहे.
म्हसवड पालिकेचा कारभार रामभरोशे सुरू असून पालिकेतील विविध विभागाच्या दाखल्यांवर व महत्वाच्या प्रकरणावर निर्णय हे पालिकेतील शिपाई पदावर नियुक्त असलेले कर्मचारीच निर्णय घेऊन तेच सह्या करत आहेत. त्यामुळे या शिपाई पदावर नियुक्त असलेले कर्मचारी हे मुख्याधिकारी असल्याच्या आवेशात वागत असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी महिना-महिना पालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडचे दाखल्यावर सही करण्याचे अधिकार काढून घेऊन सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

म्हसवड पालिकेत परिवर्तन नावाचे पॅनेल सत्तेत येऊन दीड वर्ष झाले. मात्र, या परिवर्तन आघाडीत कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात सर्व पक्षाचे स्थानिक नेते एकत्र येऊन पालिकेत सत्ता मिळवळी. पालिकेच्या राजकीय बुध्दीबळाच्या पटावर सगळेच वजिर झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील प्रशासनावर वचक राहिला नाही. मुळात पालिकेत विविध विभागासाठी असणारे कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीवर घेतलेले कर्मचारी आहेत, महत्त्वाचे म्हणजे पालिकेतील सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या आस्थापना विभाग तर चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असून पालिकेतील सर्वसामान्य नागरिकांची कामे असलेल्या जन्म-मृत्यू, व घराचे उतारा मिळणाऱ्या दाखल्यांवर व उताऱ्यांवर सही करण्याचा अधिकार तर चक्क शिपाई पदावर नियुक्त असलेल्या एका कर्मचाऱ्याकडे देण्यात आल्यामुळे पालिकेचे प्रशासन हे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीच चालवत आहेत. त्यामुळे त्यांना आपणच मुख्याधिकारी आहोत, असे वाटायला लागले आहे. त्यामुळे हे कर्मचारी सामान्य नागरिकांची कामे करत नसल्याचा आरोप नागरिकातून केला जात आहे. यावरच हा प्रकार थांबत नसून हे कर्मचारी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचे पदाधिकारीच खाजगीत सांगत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी 
मुळात पालिका कार्यलयात रितसर आदेश असलेले कर्मचारी कमी व कंत्राटी कर्मचारीच जादा असून रितसर असलेले कर्मचारी हे स्थानिकच असल्यामुळे हे कर्मचारी पदाधिकारी यांनी सांगितलेल्या कामातही राजकारण करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांतून होत आहे. एकंदरीत म्हसवड पालिकेतील प्रशासन व्यवस्थाच ढासळल्यामुळे सर्वसामान्यांची किरकोळ कामेही होत नाहीत, तर प्रशासनाचा सर्व कारभार शिक्षण नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात दिल्यामुळे या कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढली असून या मुख्याधिकाऱ्यांची पालिकेच्या कारभारावर कमांडच नसल्यामुळे आता स्वत: जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालुन प्रशासन व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)