पळशी : वर्षानुवर्षे पाणी टंचाईच्या झळा माण तालुक्याला सोसाव्या लागतात. दुष्काळ हा तर पाचवीला पुजलेलाच आहे. माणच्या मातीतील माणसाची पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची तहान आजपर्यंत भागली नाही. उन्हाळा आला की येथे टॅंकरच्या पाण्यानेच जनतेची तहान भागवली जाते. ही तहान कायमची भागवण्यासाठी पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी सध्या माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू असुन या कामात माणवासियांना उर्मी देण्याचे काम प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने हे दोन माणदेशी अधिकारी करत आहेत.
सध्या माण तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत धुमशान सुरू असून या स्पर्धेत 66 गावे सहभागी झाली आहेत. या सर्व कामात माणवासिय, राजकीय मंडळी, सामाजिक संस्था, तालुक्यातील राज्यात विविध विभागात असलेले अधिकारी या सर्वांनी एकत्र येऊन वज्रमुठ आवळली आहे. त्यामध्ये अनेक गावांना या चळवळीत घेण्यासाठी गावागावात एकजूट निर्माण करून अगदी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत सभा घेणाऱ्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांनी माणवासियांना बळ दिले आहे. त्यांनी अहोरात्र कष्ट करून पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी गावांना या प्रवाहात आणून मोठ्या जनजागृती करण्याबरोबर जनतेला काम करण्याची ताकद दिली आहे. अनेक गावातील वादविवाद मिटवून गावे एक केली आहेत.
हे दोन अधिकारी माणदेशातीलच असून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ह्यांचे गाव सांगोला तालुक्यातील मेथवडे आहे तर तहसीलदार सुरेखा माने यांच माहेर माण तालुक्यातील काळचौंडी तर सासर धामणी आहे. हे दोन्ही अधिकारी कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जातात. गतवर्षी तहसिलदार सुरेखा माने यांना अनुलोम सन्मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सध्या त्यांच्याकडुन माणवासियांना साथ मिळत आहे. ते दररोज अनेक गावांना भेटी देऊन संबंधित गावाचा कामाची माहिती घेऊन स्वतः श्रमदान करत असतात. तसेच जनतेत मिसळून ते काम करत असतात. त्यामुळे लोकांचा उत्साह वाढत आहे. एकंदरीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांनी माणवासियांना माण जलसमृध्द करण्यासाठी बळ दिले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा