सातारा पालिका अडचणीत

नगराध्यक्ष मॅडम आपली जवाबदारी ओळखा
नगराध्यक्षा माधवी कदम यांना साविआतल्या अंर्तगत गटबाजीची प्रचंड अडचण झाली आहे. माधवीताईना साविआतल्या काही जणांच्या स्वतंत्र सवतासुभ्यामुळे कामाची स्पेस मिळेनाशी झाली आहे. याची थेट उदयनराजे यांच्याकडे बऱ्याच वेळा तक्रार झाली.राजेंनी काही जणांना त्यांच्या स्टाइलने समजावून सांगितले. पण आघाडीतल्या सोकावलेल्या काही जणांना अद्याप त्याचा फरक पडलेला नाही. नगराध्यक्षांना अँटी चेंबरला बसवून त्यांच्याकडून हवी ती रणनीती ठरवण्याचा दबाव कसा टाकला जातो याचे अगणित किस्से साविआतले काही नगरसेवक चवीनं चर्चा करतात. त्यामुळे माधवीताईंनी आघाडीच्या समन्वयाने कारभार करताना स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणे आवश्‍यक आहे. गेल्या अठरा महिन्यात नगराध्यक्षांना महिला नगरसेवकांचीच गटबाजी प्रचंड त्रासाची ठरली आहे.

मलई बहाद्दरांमुळे सातारा पालिका अडचणीत
सातारा विकास आघाडीच्या कारभाराचा ताळतंत्रच सुटलाय

सातारा – कोणत्याही नगरसेवकांचे चोचले पुरवू नका असे स्पष्ट आदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिले असले तरी प्रत्यक्षात सातारा विकास आघाडीच्या काही मलई बहाद्दरांचे चोचले खुशालपणे पुरवताना नगरपालिका अडचणीत आली आहे . उदयनराजे यांनी जे सांगायचे प्रत्यक्षात त्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी वागायचे यामुळे सातारा विकास आघाडीच्या कारभाराचे ताळतंत्र सुटले असल्याची चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्याच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले हा खरा यूएसपी आहे. राजे म्हणतील ती साताऱ्यातील राजकारणाची दिशा. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर तरूणाई जाम फिदा आहे. मात्र उदयनराजे यांच्या नावाखाली साविआच्या नगरसेवकांनी साताऱ्यात पालिकेच्या आडोशाने होलसेल दुकानदारी सुरू ठेवली आहे.शिर्के शाळा मैदानाच्या निमित्ताने सुजाता राजे महाडिक यांचे चोचले पुरवण्याचे काम कोणाच्या आशिर्वादाने चालू आहे. दहा वर्ष झाली हे मैदान पालिकेच्या तिजोरीला गळती लावतेच आहे .तब्बल दोन कोटी रुपये खर्च झालेल्या या मैदानाचे कुरण बनवून क्रीडा प्रशिक्षणाचा बाजार पालिकेच्या जीवावर मांडण्यात आला आहे . म्हणजे सातारकरांच्या मैदानावर मिजास कोणाची ? तर सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची. उदयनराजे यांच्याकडे पाहून ज्यांना सातारकरांनी पालिकेत निवडून दिले त्यांनी सातारकरांच्या खिशावर डल्ला मारायचे उद्योग सुरु ठेवलेत.

राजीव गांधी मल्टीपर्पज हॉल, रखडून पडलेले मटण मार्केट, पालिकेच्या मालकीचे गाळे आणि त्यांची रखडलेली भाडेवाढ, नगराध्यक्ष कब्बड्डी स्पर्धेचे फुगलेले बजेट, विरोधकांचे विषय डावलण्याची रणनीती यामध्ये बोकड कमाईचे चोचले पुरवण्याचेच धंदे आहेत. साविआच्या नगरसेवकांनी काही विषय प्रचंड इगोचे करून ठेवलेत. अगदी गोडोलीत महाविद्यालय परिसरात पोलीस चौकीचे काम बंद पाडण्यात आले. यामध्ये काही विधिज्ञांना प्रचंड इंटरेस्ट आणि त्यांनी तो दाखवलाच. माची पेठेतील संरक्षक भिंत हा विषय सुध्दा राजकीय आकसातुन बाजूला ठेवण्यात आला. उदयनराजे यांच्या लोकाभिमुख विकासाचे स्वप्न त्यांच्याच नगरसेवकांनी पायदळी तुडवण्याचेच ठरवले आहे. उदयनराजे हा निधी विकासकामासाठी आणतात की नगरसेवकांना पोसण्यासाठी या सातारकरांच्या रोकडया सवालाचे अद्याप सातारा विकास आघाडीकडे उत्तर नाही.

सभागृहाची उंची राखण्याचे तरी भान ठेवा
सातारा पालिकेचे सभागृह हे समन्वयाने विचार करून साताऱ्याच्या विकासाची दिशा ठरवणारे सर्वोच्च सभागृह आहे . मात्र या सभागृहाला आखाडा बनवण्याचे होणारे उद्योग लोकशाहीला काळीमा फासणारे आहेत. राजकीय दहशतीत वावरणारे प्रशासन सोयीनं भाषा बदलणारे मुख्याधिकारी; विकास कामात चालढकलं आणि कमिशनच्या टक्केवारीसाठी होणारा लाळघोटेपणा यातूनच सातारा विकास आघाडी प्रचंड बेबंद झाली आहे. प्रशासनाच्या कार्यशून्यतेने सभागृहात भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दांडक्‍याची भाषा वापरली. अर्थात दांडक्‍याची भाषा वापरणारे सुध्दा राष्ट्रवादीच्या गंडवणाऱ्या संस्कृतीत रूजलेले त्यांच्या इंटरेस्टचे विषय डावलले गेल्याने जांभळे यांनी अगदी दांडक्‍याचाच इशारा दिला. यापूर्वी याच छ शिवाजी सभागृहाने अशोक मोने व वसंत लेवे या ज्येष्ठ नगरसेवक व परममित्रांची नुरा कुस्ती अनुभवली आहे. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य आणि लोकशाही पध्दतीने कामकाज चालवण्याचे संकेत याच पूर्ण भानं सत्ताधारी आणि विरोधक यांच सुटलं आहे. शेलक्‍या शब्दांनी एकमेकांची उणीदुणी काढणे यामुळे सभागृहाची उंची कमी होत आहे . नगरसेवकांना आपल्या कर्तव्याचा विसरं पडल्याची सातारकरांची तक्रार आहे. सध्या प्रेक्षागॅलरीतून प्रत्येक सभेला चालणारी ओंगळवाणी भांडणे पाहणे सातारकरांच्या नशिबी आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)