सातारा: पक्षवाढीसाठी माण-खटावमध्ये भाजपची रसद

अनिल देसाई माण तालुका नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलणार का?

बिजवडी – देशात व राज्यात भाजपाने सत्ता खेचून आणल्या असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातही आपले कमळ फुलवण्याचा प्रयत्न सहकारमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही विशेषत: माण-खटाव तालुक्‍यावर मेहरेनजर ठेवत जलसंधारणाच्या कामांना डिझेल पुरविणे तसेच विविध ठिकाणी रस्त्यासह आदी विकासकामांसाठी निधी स्वरुपात भाजपकडून रसद पुरविली जात असून ही रसद माण-खटाव तालुक्‍यात पक्षवाढीसाठी फलदायी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माण तालुक्‍यात सहकारमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी नुकताच दौरा करून श्रमदात्यांना भेट व रस्त्याचे उद्‌घाटन केले आहे. त्यांचा हा दौरा दोन्ही तालुक्‍यात पक्षवाढीसाठी मदत ठरणारा आहे. खटाव तालुक्‍यात माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचा पूर्वीपासूनच भाजपच्या विचाराचा भक्कम गट तयार असून माण तालुक्‍यात मात्र चांगले कमळ फुलवण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाईंना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. माण तालुक्‍यात पूर्वी भाजपाचे बाळासाहेब खाडे, डॉ. राजेंद्र खाडे, धीरज दवे, विजय साखरे आदी पदाधिकारी पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ व अनिल देसाईंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची चांगली साथ मिळाल्याने माण तालुक्‍यात भाजपाला थोडेफार यश मिळाले आहे. पक्षवाढीसाठी अनिल देसाई रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हक्काचा कुकुडवाड जि.प.गट सोडला तर तालुक्‍यातील बहुतांश जि. प. गटात भाजपा नावापुरतीच दिसून येत आहे. गोंदवले जि.प.गटात अनिल देसाई, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब खाडे यांचे काही प्रमाणात प्राबल्य दिसून येते मात्र, कोणीही ठामपणे गटावर हक्क सांगू शकत नाही.

माण तालुक्‍याचे भाजपाचे नेते म्हणून अनिल देसाईंकडे पाहिले जात असून आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह ते मतदारसंघात फिरताना दिसून येत आहे. भाजपाच्या विविध फंडातून विकासकामे आणण्यासाठी त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. गटाचे नेते म्हणून आजपर्यंत त्यांची ओळख असून आपली जिल्ह्याचे व तालुक्‍याचे नेते अशी ओळख निर्माण करण्यासाठीही त्यांचे प्रयत्न दिसून येत आहेत. त्यांना सहकारमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचा चांगला पाठिंबा असून त्यांच्या माध्यमातून ते मतदारसंघात कामे करत आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक निवडणुकीत अजुनही भाजपाचे स्वतंत्र पॅनेल पडत नसल्याने भाजपा तळागाळापर्यंत पोहचल्याचे दिसून येत नाही. कुकुडवाड गटाबरोबरच पळशीसह काही गावे सोडली तर तालुक्‍यातील बहुतांश गावांत कमळ फुलेल की नाही हे सांगता येत नाही अशी आज तरी परिस्थिती आहे.

अनिल देसाईंनी माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची व माण तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करत लढवली होती. या निवडणुकात बाजार समितीत दोन्ही पॅंनेलचे समान सदस्य निवडून आले होते तर खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा -कॉंग्रेसच्या युतीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. काही ग्रामपंचायतीत पॅनेल टाकून यश मिळवले आहे.

भाजपाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत असताना त्याला पदाधिकाऱ्यांची साथ मिळणे गरजेचे आहे. माण तालुक्‍यात कमळ फुलवण्यासाठी पक्षही विविध मार्गाने रसद पुरवत असून त्याचा फायदा घेऊन भाजप तळागाळापर्यंत पोहचणार का..? ,अनिल देसाई पक्षवाढीची जबाबदारी समर्थपणे पेलणार का..?,तालुक्‍यात सर्वच निवडणुकांत स्वतंत्र पॅनेल टाकणार का? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. सहकारमंत्र्यांचे माण मतदारसंघातून आमदार मिळवण्याचे स्वप्न भाजपाचे दोन्ही तालुक्‍यातील नेते माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई व त्यांचे सहकारी पूर्ण करण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)