सातारा नगरपालिकेत जोरदार राडा

छत्रपती शिवाजी सभागृहाचे प्रवेशद्वार विरोधकांनी रोखले

अजेंडा बदलल्याच्या निषेधार्थ
विरोधकांचा हल्लाबोल

पोलिस बंदोबस्तातच सभा
सुरू,तासभर गोंधळ

दहा मिनिटात तब्बल
18 विषय मंजूर

दांडक्‍याची भाषा वापरल्याने
कर्मचाऱ्यांचा अचानक संप

सातारा -सातारा पालिकेच्या इतिहासात पुन्हा एकदा सोमवारी झालेली सभा ही अभुतपूर्व गोंधळाची ठरली. दहशत, गोंधळ, शाब्दिक खडाजंगी आणि शेलक्‍या शब्दाची शेरेबाजी यावरून सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधक नगरविकास आघाडी व भाजप यांच्यात अक्षरशः जुंपली. राजकीय दबावातून विषय पत्रिका परस्पर बदलली जात असल्याच्या आरोपावरून विरोधकांनी सातारा पालिकेच्या सभागृहाचे प्रवेशद्वार अर्धातास रोखून धरले. आणि नगराध्यक्षांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याने पालिकेत पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. पत्यक्ष सभागृहात विरोधकांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत सातारा विकास आघाडीने जोरदार गोंधळ घातला. विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यात यावेत ही नगराध्यक्षांची सुचना डावलण्यात आल्याने साविआने दहा मिनिटात अठरा विषय मंजूर करून सभा गुंडाळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी सत्ताधारी आघाडीच्या दहशतीचा निषेध करून याप्रकरणावर थेट कोर्टाचे दरवाजे खटखटवणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. सातारा पालिकेची मंगळवारी झालेली सभा ही ऐनवेळी बदलण्यात आलेला अजेंडा, बीव्हीजीकडून ऐनवेळी पालिकेला मागण्यात आलेले पंधरा लाख रूपये, शिर्के शाळा मैदानाच्या बास्केटबॉल ग्राऊंडसाठी पुन्हा पंधरा लाख रूपयांची मागणी माची पेठेतील संरक्षक भिंतीचा रद्द झालेला प्रस्ताव तसेच नगरोथ्थान अभियानाअंतर्गत मालशे पुलाच्या मजबुतीकरणाचे काम डावलले गेले, या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय खेळ्यांमुळे वादग्रस्त ठरणार याची चिंन्हे होती आणि हा अंदाज सकाळीच खरा ठरला.

नगर विकास आघाडी आणि भाजपच्या एकूण अठरा नगरसेवकांनी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देवून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरूवात केल्याने वातावरण तापायला सुरूवात झाली. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची सही झालेला दि. 24 मे रोजीचा अजेंडा कोणाच्या राजकीय दबावातून बदलण्यात आला, वार्डात पडेल ठरलेले नगरसेवक जर नगरपालिका चालवत असतील ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. असा जोरदार इशारा भाजपच्या नगरसेविका आशा पंडित यांनी देत नगराध्यक्षांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी केली. यावेळी अशोक मोने अमोल मोहिते, दीपलक्ष्मी नाईक, भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, सिध्दी पवार, धनंजय जांभळे, सागर पावशे, विजय काटवटे, नविआचे शकील बागवान आदी सदस्य आंदोलनात उपस्थित होते. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपण केबिनमध्ये बसून चर्चा करू असे आश्‍वासन विरोधकांना दिले. मात्र, गोंधळ वाढतच गेला. उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के, सभागृह नेत्या स्मिता घोडके, यांनाही विरोधकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सभागृहात सभेमध्ये चर्चा करू अशी विनंती केली, मात्र ती सुध्दा फेटाळली जाऊन गोंधळ सुरूच राहिला शेवटी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. माधवी कदम यांनी कंटाळून पुन्हा केबिनचा रस्ता पकडला. पंधरा मिनिटाच्या कालावधिनंतर सत्ताधारी पुन्हा सभागृहात दाखल होताना विरोधक आणि सत्ताधारी यांची सभागृहाच्या प्रवेशद्वारावर गर्दीमुळे जोरदार रेटारेटी झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून भाजपच्या काही नगरसेवकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, यावर विजय काटवटे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

सातारा विकास आघाडीने सभा उधळली
सातारा विकास आघाडीने अगदी ठरवून विरोधकांचे कोणतेही मनसुबे सफल होऊ द्यायचे नाही, या हेतूने विरोधकांच्या गोंधळाचा फायदा उठवत दहा मिनिटात अठरा विषय मंजूर करून सभा गुंडाळली. तत्पुर्वी सिध्दी पवार, अशोक मोने, आशा पंडित यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अजेंड्याचे विषय कोणाच्या राजकीय दबावातून बदलले गेले याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. आशा पंडित यांनी त्यांच्या वार्डातील एका नगरपालिका कर्मचाऱ्याच्या अतिक्रमणाचा विषय लावून धरला आणि माची पेठेतील रिटेनिंग वॉलचा विषय का रद्द करण्यात आला. अशी विचारणा करताच सत्ताधारी पुन्हा आक्रमक झाले. ज्या पेठेतून स्वतः उदयनराजे भोसले निवडून गेले त्याच पेठेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय सातारा विकास आघाडी डावलते, हे अजिबात योग्य नाही. झारीतल्या शुक्राचार्य उदयनराजे यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप आशा पंडित यांनी केला. सिध्दी पवार म्हणाल्या पालिकेच्या सभागृहात पोलिस येतात म्हणजे आपण काहीतरी चुकीचे करतोय अशी भिती सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. यावर ऍड. दत्ता बनकर, सुहास राजे शिर्के, श्रीकांत आंबेकर प्रचंड आक्रमक झाले, आणि पुन्हा गोंधळाला सुरूवात झाली. नको ते आरोप करू नका असे स्मिता घोडके बोलताच तुम्ही आम्हाला शिकवू नका असा टोला पवार यांनी लगावला. अशोक मोने व बनकर यांच्यातही सभागृहात विषय पत्रिकेवरखुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करायचा की सभासचिवांनी यावर जोरदार खडाजंगी झाली. आरोप प्रत्यारोपाची भाषा अगदीच खालच्या पातळीवर घसरली आणि प्रकरण एकेरीवर आले. विरोधकांच्या या गोंधळाच्या आडोश्‍याने सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दहा मिनिटात अठरा विषय मंजूर करून सभा रितसर गुंडाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)