सातारा : तडीपार मटका किंग कच्छीच्या मुसक्‍या आवळल्या

उपअधीक्षक राजमाने यांची कारवाई; महागड्या मद्यासह लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा शहरासह जिल्ह्यातील नामचीन मटका किंग समीर कच्छी याने तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. कच्छी याला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून तडीपार केला आहे. त्या तडीपारी आदेशाचा भंग करून तो साताऱ्यातील घरी आला होता. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समीर कच्छी याच्यावर अवैध मटका चालवल्याप्रकरणी सातारा शहर,सातारा तालुका,शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच मारहाणीचे काही गुन्हे दाखल असल्याने त्याला सातारा जिल्ह्यातून तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी तडीपार केले होते. त्यानंतर कच्छी हा वारंवार साताऱ्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. मात्र छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कच्छी सापडत नव्हता.

त्यामुळे साताऱ्यात दाखल झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांनी “व्हिजन कच्छी’ आखून गेल्या महिन्यात राहत्या घरातून त्याच्या मुसक्‍या आवळ्या होत्या. त्यानंतरही कच्छी काही केल्या तडीपारी आदेशाचा भंग करत मटका चालवत असल्याच्या तक्रारी पोलिसांच्याकडे येत होत्या. शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांना खास बातमीदारा मार्फत समीर त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार राजमाने यांनी खास पथकामार्फत कच्छीच्या घरी छापा टाकला. पोलिस घरी आल्याची कुणकुण लागताच कच्छीने घराचे दरवाजे आतून लावून घेतला. पोलिसांनी त्याला बराच वेळ सांगूनही तो दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे अखेर राजमाने यांनी सातारा शहरचे पोलिस कॉन्स्टेबल धीरज कुंभार यांना कच्छीच्या घराच्या चौथ्या मजल्यावर चढवत गच्छीतून घरात प्रवेश केला.

त्यानंतर पोलिसांनी कच्छीच्या घरात मटका चालवत असलेल्या समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर) विनय महादेच कांबळे (रा. कोल्हापूर,सध्या रा. सैदापूर) चंद्रमन धनंजय आगाणे (रा. पिरवाडी) राजेश संपत कदम (रा. पिल्लेश्‍वरी नगर,सातारा) प्रमोद रामचंद्र पापळ (रा.जगदेश्‍वर कॉलनी सातारा) सागर शामराव महामुणी (रा.शनिवार पेठ,सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी महागड्या मद्यासह एलसीडी,प्रिंटर,झेरॉक्‍स मशिन,संगणक,जुगार खेळण्याचे साहित्य तसेच काही रोख रक्कम असा सुमारे एका लाखाचा मुद्देमाला जप्त केला आहे. या कारवाईत गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरीचे स.पो.नि विठ्ठल शेलार,सातारा तालुक्‍याचे स.पो.नि. किरण शाळीग्राम,सातारा शहरचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.कॉ. अवि चव्हाण, मोहन पवार, धीरज कुंभार, अमित माने, लैलेश फडतरे, पंकज ढाणे यांनी सहभाग घेतला होता.

… अन्‌ कच्छीने घेतली शपथ
साताऱ्यातील कुख्यात मटका किंग कच्छी याने यापूर्वी वारंवार तडीपारी आदेशाचा भंग केला होता. तेव्हा पोलिस जुजबी कारवाई करून न्यायालयात हजर करून त्याला सोडून द्यायचे. पण शुक्रवारी कच्छीने तडीपारी आदेशाचा भंग केला. अन्‌ त्याला जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, उपअधीक्षक गजानन राजमाने या धडाकेबाज अधिकाऱ्यांच्या बदलत्या कार्यपध्दतीचा अंदाज आला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात त्याला पोलिसांनी खाक्‍या दाखवताच त्याने परत तडीपारी आदेशाचा भंग करणार नसल्याची शपथच घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)