सातारा : जावली तालुक्‍यात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’

जावलीच्या राजकारणात विरोधाच्या तंत्राचा प्रवास पवार-मानकुमरेंच्या जवळीकतेची चर्चा

सातारा – जावली तालुक्‍याच्या राजकारणात विरोधाच्या तंत्राचा प्रवास बेरजेच्या राजकारणाकडे सुरू झाला आहे. अमित कदमांच्या “राजे’ स्टाईल आमदारकीची चर्चा आणि भाजपच्या दीपक पवार यांच्या बेरजेच्या राजकारणात विरोधाची अस्त्रे म्यान झाली आहेत. शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने दीपक पवारांनी जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याशी सख्य केल्याने येथील राजकीय समीकरणे धक्कादायक बनण्याची चिन्हे आहेत.
सातारा शहरातील सदरबझार याठिकाणी एका विकासकामाच्या भूमिपूजनाप्रसंगी राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जाणीवपूर्वक भाजपमध्ये प्रवेश केलेले युवानेते अमित कदम यांच्या हाती भूमिपूजनाची कुदळ देवून जावली-सातारा आमदारकीच्या यादीत त्यांचे नाव पुढे आणले.

या घडामोडीमुळे भाजप पक्षातील आमदारकीचे दावेदार जि. प. सदस्य दीपक पवार हे अस्वस्थ झाले. परंतु, लढावू बाण्यामुळे त्यांनी ते दाखवून दिले नाही. कदमांची कुदळ ही त्यांनी जमिनीवर मारली, का स्वत:च्या पायावर मारली? ते येणारा काळच ठरवेल. परंतु दोनच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची भेट घेवून दीपक पवार यांनी गोगवे येथील समाजमंदिराला जिल्हा परिषद सेस फंडातून दुरुस्तीसाठी निधी देण्याची जोरदार मागणी केली. या मागणीमुळे मानकुमरेसुद्धा आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. गोगवे हे अमित कदम यांचे गाव आहे. तर त्यांना कुदळ मारण्यास लावणारे खा. श्री. छ. भोसले यांचे व मानकुमरे यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत.

जावली तालुक्‍यात पूर्वी दिवंगत भि. दा. भिलारे गुरुजी, माजी आमदार लालसिंगराव शिंदे, जी. जी. कदम, माजी सभापती साहेबराव पवार व त्यानंतर सदाशिव सपकाळ, शशिकांत शिंदे यांचा तुल्यबळ गट होता. सध्या आमदार शिंदे हे हुमगाव व्हाया कोरेगाव मतदारसंघात स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे जावलीतील नेतृत्वाचे दोन्ही राजेंच्या वाड्यावर विलीनीकरण झाले आहे, अशी खंत कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. अशावेळी पवार-मानकुमरे यांची यारी अपेक्षित असली तरी मानकुमरे त्याला म्हणावा असा प्रतिसाद देवू शकत नाहीत.

कारण लोकसभेसाठी ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत आणि शिवसेना वरिष्ठ नेते त्यांना खासदारकी लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशावेळी राजकीय भूमिका घेताना आपली “मान’ अडकणार नाही ना, याची त्यांना काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान, मानकुमरे हे उपाध्यक्ष असल्यामुळे सगळ्याच पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांना भेटण्यासाठी येतात. यामध्ये राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्‍यनिती जावलीत नवीन नाही. यापूर्वी जावली दूधसंघाच्या निवडणुकीत पवार-मानकुमरे यांनी एकत्र येवून त्यावेळी शशिकांत शिंदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. सध्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी हभप सुहासगिरी यांनी जवळीक साधली आहे. दीपक पवार यांनीही राजकीय मतभेद विसरुन मानकुमरेंशी जुळवून घेतल्यामुळे जावलीत चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. सध्या भाजपमध्ये दीपक पवार यांचे चांगलेच वजन वाढले आहे. पण त्यांच्यासोबत आलेले काहीजण पक्षबदलू कार्यकर्ते म्हणून तालुक्‍याला परिचित आहेत. त्यांच्यापेक्षा मानकुमरेंची जवळीक साधल्यास विरोधाची धार तरी कमी होईल, याबद्दल भाजपचे कार्यकर्तेसुद्धा ठामपणाने सांगू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)