सातारा : खा. उदयनराजे विरूध्द संजीवराजे संघर्ष पेटणार

सम्राट गायकवाड 

झेडपीच्या भिंतीने गणेश विसर्जनाचा प्रश्‍न

सातारा – जिल्ह्यात राजे विरूध्द राजे सघंर्षापासून कायम अलिप्त राहिलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर आता एका निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात ओढले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सातारा शहरातील गणेश विसर्जन होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह शेती फार्मला संरक्षक भिंत घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी पालिकेवर सत्ता असलेले खा.उदयनराजे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्‍यता असून एकूणच जिल्ह्यात राजे विरूध्द राजे चालू असलेल्या संघर्षात आता गणेश विसर्जन संवेदनशील विषयाच्या निमित्ताने आणखी एका राजेंचा समावेश होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सातारा शहरातील गणेश विसर्जन मोती तळे, मंगळवार तळे व फुटका तळे आदी ठीकाणी होत असायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, मागील तीन ते चार वर्षात टप्प्या टप्प्याने अनेक कारणांनी त्या ठीकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन करणे बंद करण्यात आले. परिणामी पर्यायी व्यवस्था जिल्हापरिषदेचे प्रतापसिंह शेती फार्मच्या मोकळ्या जागेमध्ये पालिकेकडून दरवर्षी खोदकाम करून कृत्रिम तळे उभारण्यात येत होते. त्या तळ्यात शहरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र, आता जिल्हापरिषदेने विशेषत: कृत्रिम तळ्याच्या जागा व थोड्या फार प्रमाणात पुढे संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आणि नुकतेच त्या कामाचे जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भूमीपुजन करून कामास सुरूवातही करण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला मात्र जिल्हापरिषदेच्या निर्णयामुळे शहरातील गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण होणार असून त्या निमित्ताने जिल्हा परिषदेने पालिकेची एक प्रकारे कोंडीच केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. परिणामी पालिकेवर सत्ता असलेले खा.उदयनराजे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वास्तविक मागील काही वर्षापासून खा.उदयनराजे विरूध्द ना.रामराजे असा संघर्ष होत असल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यात सातारा पालिका निवडणूक व टोलनाक्‍याच्या निमित्ताने खा.उदयनराजे विरूध्द आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यात संघर्ष झाला. असे असताना आता संघर्षात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने संजीवराजे ओढले जाण्याची शक्‍यता आहे.

संजीवराजे मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यापुर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व मागील एक वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत. या कालावधीत कधीही उघडपणे कुठल्या वादामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र, आता थेट अध्यक्ष या नात्याने त्यांना खा.उदयनराजेंचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. कारण, शहरात गणेश विसर्जनासाठी मध्यवर्ती ठीकाणी व आवश्‍यक अशी जागा तशी जागा केवळ प्रतापसिंह शेती फार्म येथेच उपलब्ध आहे.

मात्र, जिल्हापरिषदेने विशेषत: त्याच जागेला संरक्षक भिंत घालण्याचा निर्णय घेवून पालिकेच्या निमित्ताने खा.उदयनराजे यांची ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे ते सहजासहजी हार मानतील अशी सद्यस्थिती नाही व तर दुसऱ्या बाजूला प्रथम दर्शनी संरक्षक भिंत घालण्याच्या निर्णय अध्यक्ष म्हणून संजीवराजे व सदस्यांनी घेतला असे ही म्हणता येणार नाही. जिल्हा परिषदेत महत्वपुर्ण व विशेषत: संवेदनशील विषयावर निर्णय होण्याअगोदर पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केली जाते व त्यानंतरच अंतिम निर्णय होतो हे आजपर्यंत दिसून आले आहे.

त्यामागे खा. उदयनराजे विरूध्द राष्ट्रवादीतील नेते अशी उभ्या संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. त्यात वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व राष्ट्रवादीचे सर्व आमदार गैरहजर राहिले आणि आता संरक्षक भिंतीच्या निमित्ताने संधी मिळेल त्या ठीकाणी ऐन प्रकारे खा.उदयनराजे यांची कोंडी करण्याची संधी राष्ट्रवादीचे नेते सोडत नाहीत हे दिसून येत आहे. मात्र या सर्व उभ्या वादात आता संजीवराजेंना सामोरे जावे लागणार असून राजे विरूध्द राजे संघर्षात आणखी एका राजेंचा समावेश या निमित्ताने झाला असेच आता म्हणावे लागेल.

तहान लागल्यावर तळे की आत्ताच ?
पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तळ्यावर दरवर्षी लाखो रूपये खर्च होत असल्याची टिका व्हायची. तसेच पालिकेच्या मालकीचे कायमस्वरूपी भव्य तळे उभारण्याची मागणी समाजातून पुढे येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हापरिषदेनेच संरक्षक भिंत घालून जागेत कृत्रिम तळे खोदण्यास एक प्रकारे विरोधच केला आहे व तो गणेशोत्सव काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, गणेशोत्सव आता दोन महिन्यांवर येवून ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर व जिल्हापरिषदेने घेतलेल्या निर्णयावर पालिका काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे.

कारण शहरातील मोठ्या सार्वजिनक मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन ज्या जागेत व्हायचे तिथे आता प्रवेशास एक प्रकारे मनाईच करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका गणेशात्सव तोंडावर आल्यानंतर तळ्याबाबत निर्णय घेणार की अत्तापासूनच तयारीला लागणार त्यावर मंडळाचे गणेश विसर्जनांचे नियोजन ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)