सातारा : कब्रस्तानचे 50 लाख रुपये सांस्कृतिक हॉलकडे वळवले

भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांचे कारनामे समोर

सातारा : मुख्यमंत्र्याच्या विशेष अनुदान योजनेत गडबड करण्याचे भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांचे कारनामे समोर आले आहेत.आयटीआय परिसरातील कब्रस्तानच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले 50 लाख रुपये त्यांनी सोमवार पेठेतील सांस्कृतिक हॉलसाठी वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. याकरिता जांभळेनी मंत्रालयाला सदर काम त्रिशंकू भागातील असल्याचे चक्क पत्र दिल्याने कब्रस्तानचा विषय आपसूक मागे पडला आहे.

जांभळे यांच्या करामतीने सयाजीराव विद्यालयासमोरील स्काय वॉक सुध्दा रद्द होउन चांगत्या कामाचा बळी गेला आहे. प.महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात बाजी मारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै 2016 मध्ये पंचवीस कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी जाहीर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीदरम्यान भाजपचे कट्टर रविंद्र पवार यांनी पोवई नाक्‍यावर स्काय वॉक व बुधवार पेठेतील इदगाह मैदानासाठी निधी दयावा अशी मागणी केली होती. डिसेंबर 2016 च्या निवडणूकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले.

राष्ट्रवादीशी नाळ ठेवणाऱ्या धनंजय जांभळे यांनी तिकिट कापले गेल्याने ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून गटनेतेपदही मिळवले. दरम्यान शासनाचा तीन कोटी रुपयांचा निधी सातारा पालिकेला प्राप्त झाला. ठेकेदारीच्या आडोशाने दीड कोटी पळवणाऱ्या सातारा विकास आघाडीशी जांभळे यांनी नेहमीच सॉफ्ट कॉर्नर ठेवला.भाजपच्या वाट्याला येणाऱ्या निधीतही जांभळे यांनी स्वतःच्या 16 क्रमांक वॉर्डसाठी पन्नास लाखाचा निधी पळवल्याचे स्पष्ट झाले. या पळवापळवीची खास पत्रे मंत्रालयातून उपलब्ध झाली असून त्यामधूनच जांभळे यांनी कब्रस्तानच्या विकासासाठी ठेवलेले 50 लाख रुपये त्रिशंकू भागाचे कारण पुढे करून रद्द केले. आणि तो निधी वैशिष्टयपूर्ण योजनेअंर्तगत स्वतःच्या वॉर्डात सांस्कृतिक हॉलसाठी वळवल्याचे स्पष्ट झाले.

रयत शिक्षण संस्थेसमोरील प्रस्तावित स्काय वॉकही बाजूला ठेवण्यात आला.जांभळे यांनी 15 मार्च 2018 रोजी थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून निधी स्वतःकडे वळवण्याची नियोजनबध्द मखलाशी केली . या प्रकारामुळे गेल्या वीस वर्षापासून सातारा शहरातील मुस्लिम बांधवांचा जिव्हाळयाचा प्रश्न असणाऱ्या कब्रस्तान विकसनाचा मुद्दा पुन्हा मागे पडला आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हा कार्यकारिणीचे नेते पुन्हा तोंडघशी पडले आहेत .

राजीनामा नगरसेवकपदाचा गटनेतेपदाचा नव्हे पालिकेतल्या असभ्य वर्तनावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना जांभळे यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा घेण्यास सांगितले होते. मात्र पावसकरांनी अप्रत्यक्षपणे दादांचा आदेश डावलतं जांभळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा घेतला. म्हणजे या कृतीवरून भाजपमधील भांडवलशाही लॉबीचे सातारा कराड कनेक्‍शनचे अनेक गोपनीय संदर्भ जाणकारांसमोर खुले झाले आहेत.

चंद्रकांत दादांच्या भूमिकेकडे लक्ष
चंद्रकांत दादांचा दि 22 रोजी पाटण दौरा होता. या दौऱ्याकडे जिल्हयाच्या वर्तुळाचे लक्ष होते. मात्र फार काही हालचाली झाल्या नाहीत. सोमवारी कदाचित कोल्हापुरातून किंवा मुंबईतून चंद्रकांत दादा कारवाईचा आदेश देतील अशी चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)