सातारा : ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

संग्रहित छायाचित्र....

किसनवीर कारखान्यावरील परिस्थिती


कर्मचारीही पगाराविनाच

सातारा : ऊसतोडणी हंगाम सुरु झाल्यानंतर ऊस घालण्यासाठी मेटाकुटीला आलेला शेतकरी आता ऊसाची बिले मिळत नसल्याने पुन्हा एकदा मेटाकुटीला आहे. वाई तालुक्‍यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोडी पूर्णत:वास गेली आहे. मात्र, जानेवारीपासून आजअखेरपर्यंत गेलेल्या ऊसाची बिलेच शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

दरम्यान, कारखान्यावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तीन-तीन महिन्यांचे पगार मिळाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मात्र, कोणीही कर्मचारी याबाबत बोलावलयास तयार नाही, कारण या गोष्टीची वाच्यता केल्यास आहे ही नोकरीसुद्धा गमावण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री कर्मचाऱ्यांना आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्‍यातील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने राज्य, देशातच नव्हे तर परदेशातही लौकिक मिळविला आहे. त्यामुळेचे परदेशी साखर उद्योगातील तज्ञांची टीम या कारखान्याला भेटी देण्यासाठी येत असते. किसन वीर कारखान्यावर राबविण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम हे सर्वच कारखान्यांसाठी नाविण्याचा विषय ठरलेले आहेत. अगदी आंबे वन, आवळा वन, यासह विविध जातीच्या वृक्षांनी किसनवीर बहरला आहे. मात्र, या साऱ्या गोष्टींमध्ये आपला मुख्य उद्देशाचाच कारखान्याला विसर पडल्यामुळे यंदा कारखाना परिसरातील ऊस वाहतूक करणाऱ्या शेकडो बैलगाड्या जागच्या हलल्यासुद्धा नाहीत.

दरवर्षी ऊस तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांच्या टोळ्या यंदा निम्याच्या संख्येपेक्षाही कमी होत्या. त्यामुळे कारखाना रडतखडत कसातरी चालू असल्याचेच विदारक चित्र यंदा पहावयास मिळत होते. ऊसतोड मजुरांची अपुरी संख्या पाहता सुरुवातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. ऊस जाणार की नाही? या काळजीत बुडालेल्या शेतकऱ्यांचा ऊस मार्चअखेरीस का होईना पण गेला. अनेक शेतक्‍यांना ऊस जाण्यासाठी पेटवावा लागला तो भाग वेगळाच. ऊस घालवण्यासाठीही मजुरांना एक्‍स्ट्रा पैसे मोजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

एकरी चार ते पाच हजार रुपये तोडणीसाठी शेतकऱ्याला मोजावे लागले. मात्र, तरीही ऊस गेल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत होते. परंतु, आता तीन-तीन महिने उलटल्यानंतरही ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. याबाबत कोणाकडे विचारणा करायची? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडू लागला आहे. ऊसाचे बिल नेमके कधी मिळणार याबाबतही कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. ऊसबिले न मिळाल्याने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा आकडा वाढत आहे.

याशिवाय शेतीच्याच कामासाठी हातऊसणे पैसे घेतलेलेही आता तगादा लावत आहेत. एकंदरीत उसाच्या पिकावर आर्थिक उलाढाल असलेला शेतकरी आता चांगला आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विरोधकांचीही चुप्पी
नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने टीका करण्याची संधी न सोडणारे विरोधक कारखान्याच्या विषयावर मात्र बोलायलाही तयार नाहीत. ऊस बिले न मिळाल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांकडे माडल्याही आहेत. मात्र, याविषयी कोणीच आवाज काढायला मागत नसल्याने विरोधकांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त होऊ लागला असून “तेरी भी चुप, मेरी भी चुप’ असेच काही चित्र वाई तालुक्‍यात दिसत आहे.

पैसा होता तेव्हा उधळपट्टी
ज्यावेळी कारखान्याकडे पैसा होता. त्यावेळी कारखान्यावर आठ दिवसांला कार्यक्रम, त्यासाठी लाखोंचा खर्च, आमंत्रित पाहुण्यासाठी अगदी पुण्याहून खास जेवणाच्या ऑर्डरी दिल्या जात असल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, राजकारणातील दिग्गज नेतेमंडळी यासह विविध पाहुण्यांच्या पाहुणचारावरच कारखान्याचे लाखो रुपये उधळले गेल्याचेही बोलले जात आहे. आणि आता शेतकऱ्याला द्यायला कारखान्याकडे पैसा नाही? अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत.

कर्मचारीही पगाराविना
किसन वीर कारखान्यावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन-तीन महिने पगार मिळत नसल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनीची दिली आहे. याबाबत अधिक माहिती विचारली असता आमच्या नोकऱ्या घालवता अशा प्रतिक्रियाही या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे किसनवीरच्या कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार खाण्यापलिकडे दुसरा मार्गही उरला नसल्याचेच प्रकर्षाने जाणवत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)