सातगाव पठारचे शेतकरी फळपिकांकडे आकर्षित

पेठ – सातगाव पठार भागातील शेतकरी हा सध्या फळझाडे लागवडीकडे वळताना दिसून येत आहे. पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी फळझाडे लागत आहेत. येथील शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पेठ येथील अनिल, नितीन, जितेंद्र शहा या तीन बंधूंनी मिळून सव्वा एकरमध्ये फळझाडे लागवडीचा निर्णय घेतला आहे.
फळझाडांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत अधिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षांपासून फळपिक लागवड परिसरात विस्तारात आहे. पारंपरिक शेतीच्या जोडीला फळपिक लागवड क्षेत्र वाढविण्याकडे शेतकरी वर्ग प्रयत्नशील असल्यासचे दिसून येत आहे. वेंगुर्ला (कोकण) येथून या तीनही बंधूंनी केसर आंबा-140 झाडे आणि बाणवली जातीचे नारळ 120 झाडे अशी एकूण 260 झाडे आणली आहेत. झाडांची उंची सरासरी पाच फूट आहे. वाहतूक खर्च धरुन संपूर्ण खर्च 52 हजार खर्च झालेला आहे. यासाठी अजून शेणखत, खड्डे, टिंबक याचा खर्च अंदाजे दीड लाख रुपये येण्याचा अंदाज आहे. शेतामध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याचे उत्तम नियोजन करून टिंबक सिंचनाद्वारे ही झाडे जगविण्याचा मानस या शहा यांनी व्यक्त केला आहे.
तसेच पेठ येथील संभाजी काळे, बाळासाहेब काळे, रामदास काळे, महादेव कातोरे या शेतकऱ्यांनी सुद्धा कोकणातून फळझाडे आणून त्यांची उत्तमरीत्या जोपासना केली आहे. फळझाडांच्या निमित्ताने का होईना झाडे लावा, झाडे जगवा या शासनाच्या योजनेला बळकटी देताना हे शेतकरी दिसत आहेत.

शेतीमधून पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळेलच याची खात्री नाही. यांत्रिकीकरणाचे वाढलेले दर, मजुरांचा तुटवडा यामुळे फळझाडे लागवडीचा निर्णय घेतला आहे.
नितीन मणिलाल शहा, शेतकरी.

Leave A Reply

Your email address will not be published.